प्रतिकूल काळातील ज्येष्ठांचा त्याग अनुकूल काळात विसरू नये : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:49 AM2019-09-01T00:49:31+5:302019-09-01T00:51:18+5:30
आपल्या ज्येष्ठांनी प्रतिकूल काळामध्ये परिस्थितीच्या बदलासाठी जो त्याग केला आणि परिश्रम घेतले, त्याचा विसर अनुकूल काळात आम्हाला पडता कामा नये. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेली मेहनत अपार होती. कुमार शास्त्री यांच्या लेखणीने घेतलेली नोंद येत्या काळात याचे विस्मरण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या ज्येष्ठांनी प्रतिकूल काळामध्ये परिस्थितीच्या बदलासाठी जो त्याग केला आणि परिश्रम घेतले, त्याचा विसर अनुकूल काळात आम्हाला पडता कामा नये. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेली मेहनत अपार होती. कुमार शास्त्री यांच्या लेखणीने घेतलेली नोंद येत्या काळात याचे विस्मरण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
विवस्वान प्रकाशन संस्थेच्यावतीने शनिवारी अरुणकुमार शास्त्री लिखित भारतरत्न अटलजी (लेखांजली), शतजन्म शोधिता (मुलाखती) आणि प्रसादपुष्प (व्यक्तिीरेखा) या तीन पुस्तकांचे प्रकाशन पार पडले. त्या प्रसंगी ते बोलत होते. समारंभाला प्रमुख पाहुणे गिरीश गांधी होते. भाष्यकार म्हणून ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणशास्त्री जोशी, श्रीपाद अपराजित आणि आशुतोष अडोणी आणि लेखक कुमार शास्त्री व्यासपीठावर उपस्थित होते.
कुमार शास्त्री यांच्या लेखनाच्या व्यासंगाचा आणि भारतरत्न अटलजी या पुस्तकाचा उल्लेख करून नितीन गडकरी म्हणाले, वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व मोठे होते. सर्वच पक्षातील लोकांशी त्यांचे संबंध असले तरी त्यांची विचारधारा मात्र नेहमीच स्पष्ट राहिली. पक्षबांधणीच्या काळातील प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले परिश्रम विसरून चालणार नाही.
गडकरी आपल्या भाषणात भूतकाळात रमले. अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. पक्षाच्या दृष्टीने तो काळ उपहासाचा होता. आपले उमेदवार निवडून येणार नाही हे माहीत असतानाही अनेक ठिकाणी आम्ही जिद्दीने भाषणे ठोकायचो. छोटूभय्या हे आपणास गुरुस्थानी होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच कुमार शास्त्री यांच्यात उपजत गुण होते. ते पत्रकार आणि लेखकाच्या रूपाने प्रगटले.
प्रसादपुष्प या पुस्तकावर भाष्य करताना आशुतोष अडोणी म्हणाले, लेखकाने या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकांना लखलखीत साद घातली आहे. महापुरुषांच्या आयुष्यातील मूल्यबोध हे या पुस्तकातील समान सूत्र आहे. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामभाऊ शेवाळकर, कवी ग्रेस, दीनदयाल उपाध्याय, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस यांच्यासारख्या अनेक महापुरुषांच्या जीवनाचे वेगळे पैलू लेखकाने मांडत वाचकांच्या मनाला घातलेली साद म्हणजे तपोपूत जीवनाची तीर्थोदके आहेत.
डॉ. कुमार शास्त्री म्हणाले, ही तीन पुस्तके म्हणजे त्रिदल आहे. पुस्तकरूपाने बांधलेली ही त्रिगुणाकार विचारांची पूजा पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी, हा आपला हेतू आहे. मुलाखत ही नवनिर्मिती असते. सृजनाच्या निर्मितीसाठी तळाशी जावे लागते, हे सांगत त्यांनी आपल्या तिन्ही पुस्तकांबद्दल माहिती दिली.
गिरीश गांधी म्हणाले, लेखकाच्या गुणाची निष्पत्ती लेखनातून प्रगटत असते. विचारांचा समतोल ढळू न देता डॉ. कुमार शास्त्री यांनी केलेले लेखन सर्वव्यापी ठरावे, असेच आहे. याप्रसंगी लक्ष्मणराव जोशी यांनी भारतरत्न अटलजी या पुस्तकावर तर श्रीपाद अपराजित यांनी शतजन्म शोधिता या पुस्तकांवर भाष्य केले. कार्यक्रमादरम्यान प्रकाशन संस्थेचे अजय धाक्रस यांचा सत्कार करण्यात आला. संचालन रेणुका यांनी केले. पसायदानाने सांगता झाली. शहरातील गणमान्य नागरिक समारंभाला उपस्थित होते.