गोवंश संवर्धनासाठी झटणारे रायपूरचे ‘फैज खान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 09:47 AM2018-06-20T09:47:04+5:302018-06-20T09:47:20+5:30
गोवंशाचा मुद्दा समोर करून हा आपलाच ‘कॉपीराईट’ असल्याचा आविर्भाव आणणाऱ्या संघटनांना रायपूर येथील फैज खान यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या गोवंशाचे राजकीय महत्त्व गेल्या काही काळापासून जास्त वाढले आहे. गोवंश संरक्षणाच्या नावाखाली सामाजिक वातावरणदेखील गढूळ करण्याचा प्रयत्न झाला. मात्र गोवंश संवर्धन हा धर्माशी जुळलेला मुद्दा नसल्याचे एका मुस्लीम धर्मीयाने दाखवून दिले आहे.
गोवंशाचा मुद्दा समोर करून हा आपलाच ‘कॉपीराईट’ असल्याचा आविर्भाव आणणाऱ्या संघटनांना रायपूर येथील फैज खान यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे. गोवंश संवर्धनासाठी झटणारे फैज हे गेल्या वर्षभरापासून देशभरात भ्रमण करत आहेत. पदयात्रेच्या माध्यमातून गोसेवेचा संदेश देणाऱ्या फैज यांनी सामाजिक समरसतेचे उदाहरणच उभे केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गोसेवेचे कार्य करणारे फैज खान हे रायपूर येथे प्राध्यापक होते. मात्र गोसंवर्धनासाठी वाहून घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तेथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. काही वर्ष त्यांनी देशातील विविध भागात गोकथा ऐकविण्यासाठी भ्रमंती केली. नमाजने दिवसाची सुरुवात करणारे फैज खान दुपारी गोकथा ऐकवायचे. गोवंशाच्या मुद्यावरून देशातील बिघडते वातावरण लक्षात घेऊन त्यांनी गोवंशाचे महत्त्व व सामाजिक समरसतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी देशात पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला व २४ जून २०१७ रोजी लेह येथून यात्रेला सुरुवात केली. लेह ते कन्याकुमारी व त्यानंतर कन्याकुमारी ते अमृतसर अशी त्यांची ही यात्रा राहणार आहे. वर्षभरात फैज खान यांनी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड या राज्यांना भेटी दिल्या. सध्या ते महाराष्ट्रात असून नागपुरातदेखील त्यांनी लोकांची भेट घेतली. फैज खान हे आपल्या एकूण यात्रेदरम्यान १२ हजार किलोमीटरची पदयात्रा करणार आहेत. आतापर्यंत सुमारे ६ हजार किलोमीटर ते चालले असून पुढील वर्षी जूनपर्यंत त्यांची ही यात्रा चालणार आहे.
अशी मिळाली प्रेरणा
प्राध्यापक म्हणून सरळसोपे आयुष्य जगण्याचा त्यांच्याकडे पर्याय होता. मात्र गिरीश पंकज यांनी लिहिलेले ‘गाय की आत्मकथा’ हे पुस्तक वाचून ते अस्वस्थ झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला गोसेवेला वाहून घेण्याचा निर्णय घेतला व याच संकल्पातून गोसेवा सद्भावना यात्रेला सुरुवात झाली. आपल्या यात्रेदरम्यान ते विविध ठिकाणी चौपाल लावतात व नागरिकांशी संवाद साधतात. सोबतच मोठ्या नद्यांचे पाणीदेखील ते आपल्या सोबत घेत आहेत. हे सर्व पाणी एकत्रित करून कन्याकुमारी येथे विसर्जित करणार आहेत.
गाय हा धर्माच्या पलीकडचा विषय
गाय ही जगाची माता आहे. केवळ हिंदू किंवा मुस्लीम या धर्माचा हा विषय नाहीच. धर्माच्या पलीकडचा हा मुद्दा आहे. भारतीय देशी गोवंशाचे प्रमाण कमी होत आहे. त्याचे संवर्धन व्हावे हा माझा उद्देश आहे. यासाठी जनतेपर्यंत आरोग्य, पर्यावरण, समाज व संस्कृतीच्या दृष्टीने गोवंशाचे महत्त्व पोहोचले पाहिजे. माझ्या यात्रेचा हाच उद्देश आहे, असे फैज खान यांनी सांगितले. गाईच्या नावावर समाजात विद्वेष वाढविणे अयोग्य आहे, असे फैज खान यांनी सांगितले. गोहत्येवर देशभरात बंदी लावण्यासाठी केंद्रीय कायदा तयार करण्यासाठी ते आपल्या यात्रेदरम्यान लोकप्रतिनिधींच्या भेटीदेखील घेत आहेत.