नागपूरच्या व्यापाऱ्याला एफबीआयने केली अटक : प्रतिबंधित ड्रग्जच्या विक्रीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:40 PM2019-06-24T21:40:37+5:302019-06-24T21:42:12+5:30

प्रतिबंधित असलेले ड्रग्स औषधाच्या रूपाने युरोप-अमेरिकेत निर्यात करणाऱ्या जितेंद्र बेलानी नामक व्यापाऱ्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) चेकोस्लाविया विमानतळावर नाट्यमयरीत्या अटक केली. बेलानीच्या अटकेमुळे नागपूरच नव्हे तर या गोरखधंद्यात सहभागी असलेल्या भारतातील अनेक औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

FBI arrested Nagpur's merchant: Allegations of sale of prohibited drugs | नागपूरच्या व्यापाऱ्याला एफबीआयने केली अटक : प्रतिबंधित ड्रग्जच्या विक्रीचा आरोप

नागपूरच्या व्यापाऱ्याला एफबीआयने केली अटक : प्रतिबंधित ड्रग्जच्या विक्रीचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देसापळा रचून चेकोस्लावियात पकडले : औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिबंधित असलेले ड्रग्स औषधाच्या रूपाने युरोप-अमेरिकेत निर्यात करणाऱ्या जितेंद्र बेलानी नामक व्यापाऱ्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) चेकोस्लाविया विमानतळावर नाट्यमयरीत्या अटक केली. बेलानीच्या अटकेमुळे नागपूरच नव्हे तर या गोरखधंद्यात सहभागी असलेल्या भारतातील अनेक औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
जरीपटक्यात राहणारा बेलानी काही वर्षांपूर्वी सर्वसाधारण औषध विक्रेता म्हणून आोळखला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बेलानीने विशिष्ट प्रकारचे ड्रग्ज तयार करून ते देश-विदेशात विकण्याचा गोरखधंदा सुरू केल्यानंतर तो कोट्यवधीत खेळू लागला. प्रतिबंधित असलेल्या युरोप, अमेरिकेत ही औषधे मोठ्या प्रमाणात बेलानी निर्यात करू लागला. भारतातून आयात होत असलेल्या प्रतिबंधित औषधांचा अमेरिकेत वापर वाढल्याने अमेरिकन तपास यंत्रणांनी या औषधांकडे लक्ष वेधले. औषधात असलेले कंटेन्ट (घटकद्रव्य) नाव आणि प्रमाण बदलून येत असल्याचे लक्षात येताच, या औषधांचा वापर करणाऱ्यांची एफबीआयने चौकशी केली. त्यानंतर हे औषध पाठविणाऱ्या निर्यातकांवर नजर रोखली. त्यात बेलानीही नजरेत आला. त्यामुळे एफबीआयने बेलानीला समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, समन्स मिळताच बेलानीने अमेरिकेत औषध निर्यात करणे बंद केले. समन्सला बेलानीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून, एफबीआयने बेलानीला जेरबंद करण्यासाठी सापळा लावला. त्याला एका औषध विक्रेत्याच्या माध्यमातून औषध खरेदी करण्याच्या नावाखाली चर्चेसाठी चेकोस्लावियाला येण्याचे निमंत्रण दिले. बेलानीने तिकडे जाण्यास नकार देऊन त्या व्यापाऱ्याला मुंबईत येण्यास सांगितले. बेलानी तिकडे यायला तयार नसल्याचे पाहून, एफबीआयतर्फे त्या व्यापाऱ्याने पाच कोटींचे औषध घ्यायचे आहे, असे बेलानीला सांगितले. एवढ्या मोठ्या डीलची ऑफर मिळाल्याने बेलानी जाळ्यात अडकला. तो निशांत सातपुते नामक साथीदाराला सोबत घेऊन ३ जूनला चेकोस्लावियाला गेला. प्रेग (चेकोस्लाविया) विमानतळावर उतरताच बेलानीला चेकोस्लाविया पोलीस तसेच एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या ताब्यात घेतले. प्रदीर्घ चौकशीत सातपुतेचा या गोरखधंद्याशी काहीएक संबंध नसल्याचे लक्षात आल्याने, त्याला सोडून देत चेकोस्लाविया पोलिसांनी बेलानीला अटक केली. त्याच्या अटकेचे वृत्त नागपुरात धडकताच संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
ऑनलाईन नेटवर्कमधून बेलानी अधोरेखित
कामोत्तेजना आणि विशिष्ट प्रकारची नशा आणणाऱ्या या औषधांचे मानवी शरीरावर होणारे गंभीर परिणाम लक्षात आल्यामुळे युरोप-अमेरिकेत या औषधांच्या खरेदी विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याची खरेदी विक्री करणाऱ्यांना कठोर शिक्षेचे प्रावधानही आहे. भारतात मात्र या औषधांची दुकाने गल्लीबोळात आढळतात. सहजपणे ही औषधं कुठेही मिळतात. दुष्परिणामांची जाणीव नसल्यामुळे ही औषधे स्वस्त आणि मस्त समजली जातात. त्याचमुळे भारतासह विविध देशात त्याची प्रचंड मागणी आहे. कमी किमतीत उपलब्ध असल्याने युरोप अमेरिकेतही ती लपून छपून, नाव बदलून विकण्यात येतात. नागपूरसह ठिकठिकाणचे व्यापारी ऑनलाईन ऑर्डर घेऊन तिचा पुरवठा करतात अन् महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतात. बेलानी तसेच अन्य काही व्यापाऱ्यांनी या गोरखधंद्यातून कोट्यवधींची कमाई केली आहे. एफबीआयने या ऑनलाईन मार्केटिंग नेटवर्कचा छडा लावून बेलानीला जाळ्यात अडकवले.
१२ जुलैला सुनावणी
सध्या बेलानी चेकोस्लाविया पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचा ताबा मिळावा म्हणून एफबीआयने तेथील न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर १२ जुलैला सुनावणी आहे. या सुनावणीत बेलानीची कस्टडी एफबीआयला मिळाली तर बेलानीच्या भवितव्यावरच प्रश्न लागण्याची शक्यता आहे. कारण प्रतिबंधित ड्रग्ज विकणे अमेरिकेत मोठा गुन्हा मानला जातो. भारतात अमली पदार्थ विकणाऱ्यांना (तस्करांना) ज्याप्रमाणे कडक शिक्षा सुनावण्यात येते, त्याहीपेक्षा कितीतरी अधिकपट जास्त कडक शिक्षेची अमेरिकेत तरतूद आहे. त्यामुळे बेलानीचा ताबा एफबीआयने मागितल्याचे कळल्याने त्याच्याशी संबंधितांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बेलानीकडे असलेला औषध विक्रीसंबंधीचा परवाना आणि इतर आवश्यक कागदपत्रे चकोस्लाविया पोलिसांकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते.

Web Title: FBI arrested Nagpur's merchant: Allegations of sale of prohibited drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.