नागपुरात मास्कच्या काळबाजारावर एफडीएची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:33 AM2020-03-17T00:33:10+5:302020-03-17T00:33:54+5:30
एमआरपीनुसार ‘एन-९५’ मास्कची किमत १५० रुपये असताना २१० रुपयांमध्ये विक्री होत असल्याचे चौकशीत आढळून आल्याने सोमवारी औषध व अन्न प्रशासनाने (एफडीए) दवाबाजारातील एका सर्जिकल होलसेल विक्रेत्यावर कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआरपीनुसार ‘एन-९५’ मास्कची किमत १५० रुपये असताना २१० रुपयांमध्ये विक्री होत असल्याचे चौकशीत आढळून आल्याने सोमवारी औषध व अन्न प्रशासनाने (एफडीए) दवाबाजारातील एका सर्जिकल होलसेल विक्रेत्यावर कारवाई केली. या कारवाईने मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोरोना विषाणूच्या दहशतीचा फायदा घेत काही औषध विक्रेते ‘एन-९५’ मास्कचा काळाबाजार करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली. मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी टाका, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) दिले होते. त्यानुसार ‘एफडीए’ कामाला लागले. परंतु त्यांना यश येत नसल्याचे पाहत ‘लोकमत’ने १३ मार्च रोजीच्या अंकात ‘मास्कचा काळाबाजार सुरूच’ या मथळ्याखाली पुन्हा सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. यात दवाबाजारातील एका ‘सर्जिकल स्टोअर्स’ने ‘बॅच क्र. १७०८ जी १७७ एनई’ एन-९५ मास्क ज्याची किमत एमआरपीनुसार १५० असताना ग्राहकाला २०० रुपये व ‘जीएसटी’ १० रुपये असे एकूण २१० रुपये किमतीनुसार पाच मास्क १०५० रुपयात विकल्याचे वास्तव मांडले. याची माहिती पुन्हा जिल्हाधिकारी ठाकरे यांना देण्यात आली. त्यांनी संबंधित विभागाला पुन्हा सूचना केल्या. त्यानुसार, सोमवारी दवाबाजारातील सर्जिकल होलसेल विक्रेत्यांची तपासणी औषध प्रशासनाचे सहआयुक्त पी.एन. शेंडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यात एका होलसेल विक्रेत्यावर व एका उत्पादन विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई केली तर तनुश्री सर्र्जिकल होलसेल विक्रेत्याची खरेदी व विक्रीवर बंदी आणली. या कारवाईने काळाबाजार करणाऱ्यांवर काही प्रमाणात वचक बसण्याची शक्यता आहे.
विक्री व खरेदी बंदची कारवाई
मास्कचा काळाबाजार होत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने गांधीबाग दवाबाजारातील तनुश्री सर्जिकल या होलसेल विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. पुढील आदेशापर्यंत या स्टोअर्समधून विक्री व खरेदीवर बंदी आणण्यात आली आहे.
पी.एन. शेंडे
सहआयुक्त, औषध प्रशासन