एफडीएची कारवाई : नागपुरात २.१० लाखांचा गुटखा व तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:42 PM2019-02-06T23:42:09+5:302019-02-06T23:42:53+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धाडीत बुधवारी २.१० लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे. तंबाखू आणि गुटख्याची विक्री नागपुरातील ५०० पेक्षा जास्त पानटपऱ्यांवर विषारी सुपारीयुक्त खर्रा तयार करून करण्यात येते. अधिकाऱ्यांनी पानटपऱ्यांवर धडक मोहीम राबवून धाडी टाकून तंबाखूपासून तयार करण्यात येणाऱ्या खऱ्र्याचा व्यवसाय बंद करावा, अशी मागणी लोकांनी लोकमतशी बोलताना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धाडीत बुधवारी २.१० लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे. तंबाखू आणि गुटख्याची विक्री नागपुरातील ५०० पेक्षा जास्त पानटपऱ्यांवर विषारी सुपारीयुक्त खर्रा तयार करून करण्यात येते. अधिकाऱ्यांनी पानटपऱ्यांवर धडक मोहीम राबवून धाडी टाकून तंबाखूपासून तयार करण्यात येणाऱ्या खऱ्र्याचा व्यवसाय बंद करावा, अशी मागणी लोकांनी लोकमतशी बोलताना केली.
अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे यांनी ६ फेब्रुवारीला मिळालेल्या माहितीच्या आधारे जुबेर किराणा, आझादनगर, टेका येथील पेढीवर पाळत ठेवल्यानंतर प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा (सागर), पानमसाला (पानबहार), सुगंधित तंबाखू (रत्ना, बाबा ब्लॅक, रिमझिम) आदींचा २.१० लाख रुपये किमतीचा २४७ किलो साठा विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. हा साठा अधिकाऱ्यांनी जप्त केला. साठ्यातून सहा नमुने घेण्यात आले. उर्वरित साठा अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसार जप्त करून अन्न व औषध प्रशासन कार्यालयात जप्त करण्यात आला.
प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा मोहम्मद अहमद इंतियाज अहमद अन्सारी यांच्या मालकीचा असून, त्यांचे दुकान सीलबंद करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात कलम १८८, २७२ व ३२८ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी अनंत चौधरी, प्रफुल्ल टोपले, विनोद धवड, किरण गेडाम व महेश चहांदे यांनी केली.
जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित व स्वादिष्ट सुपारी आणि खर्रा आदी प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, वितरण, साठवण व विक्री होत असल्याचे आढळल्यास, त्याबाबत प्रशासनास माहिती देऊन गुटखाबंदी प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केकरे यांनी केले आहे.