गणेशोत्सवाच्या प्रसादावर एफडीएची नजर : भेसळीच्या खाद्यपदार्थांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 08:27 PM2019-08-30T20:27:17+5:302019-08-30T20:28:33+5:30
भेसळयुक्त खव्यापासून आरोग्य धोक्यात येते. शिवाय, महाप्रसादातून विषबाधा होण्याची शक्यता असते. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागपूरकरांचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कंबर कसली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सणासुदीच्या दिवसांमध्ये भेसळीचे अनेक प्रकार समोर येतात. विशेषत: गणेशोत्सवामध्ये खव्याचे पेढे आणि मोदक प्रसाद म्हणून वाटले जातात. भेसळयुक्त खव्यापासून आरोग्य धोक्यात येते. शिवाय, महाप्रसादातून विषबाधा होण्याची शक्यता असते. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागपूरकरांचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कंबर कसली आहे. गणेशोत्सव मंडळाची नोंदणी करणाऱ्या महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला मंडळाची यादी मागितली आहे, सोबतच मंडळाला परवानगी देताना अन्न व औषध प्रशासनाकडे तशी नोंदणी करण्याची अट घातली आहे.
गणेशोत्सव...एक आनंदसोहळा... धार्मिक व्रतवैकल्याचा एक प्रमुख भाग. लहानांपासून थोरांपर्यंत जो तो आपल्या परीने या उत्सवाचा आनंद लुटतो. गणराया आपल्यासोबत तब्बल दहा दिवस राहणार तेव्हा त्याची बडदास्त कशी ठेवता येईल याचेच विचार प्रत्येकाच्या मनात असतात. घरातील सर्व सदस्य एका वेगळ्याच उल्हासाने कामास लागतात. करंज्या, मोदक, लाडू, शंकरपाळे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करायला सुरुवात होते. यात घरातील स्त्रियांचे कौशल्य पणाला लागते. किंवा हॉटेलमधून आणण्याची लगबग सुरू होते. साहजिकच घरात रोज काही ना काही गोडधोड केले जाते. शिवाय आरतीसाठी रोज वेगवेगळी खिरापत म्हणून विविध प्रकारच्या मिठाया व मोदक असतातच. परंतु सर्व काही भक्तिभावाने होत असताना त्यात भेसळीचे विरजण पडते. चीड-मनस्ताप सहन करण्यापलिकडे काहीच उरत नाही. या काळात भेसळीच्या खाद्यपदार्थांना घेऊन तक्रारीही वाढलेल्या असतात. याची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारपासून हॉटेलमधील अन्न पदार्थांचे नमुने घेणे सुरू केले आहे. गोळा केलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे.
महाप्रसादावर विशेष लक्ष
बहुसंख्य गणेशोत्सव मंडळ महाप्रसादाचे आयोजन करते. या महाप्रसादातून विषबाधा होऊ नये याकडे विशेष लक्ष ठेवण्यासाठी मंडळाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी ‘एफडीए’ने शुक्रवारी महानगरपालिकेला गणेशोत्सव मंडळाची यादी मागितली आहे. तसेच मंडळांना परवानगी देताना ‘एफडीए’कडे तशी नोंदणी करण्याचे पत्रही दिले आहे.