प्रसाद वाटपावर एफडीएची नजर
By admin | Published: September 14, 2015 03:23 AM2015-09-14T03:23:10+5:302015-09-14T03:23:10+5:30
अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना प्रसाद वाटपासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
नागपूर : अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना प्रसाद वाटपासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी विभागातील सेतू कार्यालयात अथवा आॅनलाईन १०० रुपये शासकीय शुल्क भरून आॅनलाईन फॉर्म ‘ए’ भरायचा आहे. अर्थात महाप्रसादासाठी एफडीएचा आॅनलाईन परवाना बंधनकारक झाला आहे.
सणासुदीच्या दिवसात भेसळीवर प्रतिबंध लावण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. यासंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जनजागृती नाही. त्यासाठी विभाग प्रयत्नरत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागीय सहआयुक्त (अन्न विभाग) शिवाजी देसाई यांनी लोकमतशी बोलताना दिली.
धार्मिक उत्सवांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याच पदार्थांपासून प्रसाद तयार केला जातो. दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात खराब होतात. या काळात या पदार्थांना मागणी जास्त असल्याने भेसळीच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. याशिवाय प्रसाद वाटताना आणि त्या स्थळी स्वच्छता नसल्याने विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यावर प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यादरम्यान खवा आणि दुग्धजन्य पदार्थांचे विक्रेते आणि मिठाई दुकानांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. याशिवाय अन्य राज्यातून येणारा खवा गोदामात जास्त दिवस साठवून ठेवण्यात येत नाही. अशा खव्यापासून तयार होणारी मिठाई लवकरच खराब होते आणि खाण्यायोग्य नसते.