अकरावीच्या ५० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:31 PM2020-08-31T22:31:57+5:302020-08-31T22:33:18+5:30
शिक्षण संचालनालयातर्फे महापालिकेच्या हद्दीत अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. पण ही प्रक्रिया शहरातील ज्युनियर कॉलेजची डोकेदुखी वाढविणारी आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील अनेक कॉलेजच्या जागा रिक्त राहत असल्याची ओरड होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षण संचालनालयातर्फे महापालिकेच्या हद्दीत अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. पण ही प्रक्रिया शहरातील ज्युनियर कॉलेजची डोकेदुखी वाढविणारी आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील अनेक कॉलेजच्या जागा रिक्त राहत असल्याची ओरड होत आहे. गेल्यावर्षी ५८ हजार जागांपैकी २१ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यावर्षी ही संख्या ५० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
शहरातील २१६ कॉलेजमध्ये यावर्षी अकरावीच्या ५९,०४० जागा आहेत. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ४०,२२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दहावीचा निकाल जास्त लागला आहे. शिवाय सीबीएसई बोर्डाचाही निकाल उत्तम आला आहे. त्यामुळे यंदा उपलब्ध जागेपेक्षा नोंदणी अधिक होईल, असा अंदाज होता. मात्र ४० हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ३३,६९० विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला. ३३,६३० विद्यार्थ्यांनी दुसरा भाग भरला. तर २९,१५७ विद्यार्थ्यांनी ऑप्शन भरले. ३० सप्टेंबरला समितीने प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पण नोंदणी अजूनही सुरूच आहे. परंतु आतापर्यंत झालेली नोंदणी लक्षात घेता रिक्त जागांच्या आकडेवारीत फार फरक पडणार नाही, असे भाकीत कॉलेज संचालकांनी वर्तविले आहे.
- ऑनलाईन झालेल्या नोंदणीवरून लक्षात येते की कला, वाणिज्य, एमसीव्हीसी शाखा मराठी माध्यमाच्या अनुदानित जागा रिक्त राहणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. तसेच शाळेला जोडलेल्या मराठी माध्यमाच्या तुकड्या तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. अशोक गव्हाणकर
महासचिव, विज्युक्टा