अभियांत्रिकीचे प्राध्यापकांमध्ये अतिरिक्त ठरण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:27 AM2020-12-12T04:27:36+5:302020-12-12T04:27:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून अभियांत्रिकीचा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात प्रयत्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून अभियांत्रिकीचा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. मात्र नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर ‘एआयसीटीई’च्या (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) निर्देशांनुसार ‘वर्कलोड’ कमी होऊन अतिरिक्त ठरण्याची भीती प्राध्यापकांमध्ये आहे. मात्र नवीन अभ्यासक्रमाची रचना ही ‘अॅक्टिव्हिटी बेस्ड’ असल्याने प्राध्यापक अतिरिक्त ठरणार नाही. उलट काही विषयांच्या प्राध्यापकांचे काम वाढण्याची शक्यता आहे.
‘एआयसीटीई’च्या जुन्या नियमावलीनुसार ‘बीई’ व ‘बीटेक’ या अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांचे गुणोत्तर २० : १ असे होते. म्हणजे २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे गणित होते. मात्र ‘एआयसीटीई’ने यंदा नियमावलीत बदल केला व गुणोत्तर १५ : १ असे झाले आहे. म्हणजेच विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत प्राध्यापकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांतील प्राध्यापकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असून ‘अॅक्टिव्हिटी बेस्ड’ अभ्यासक्रम राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही महाविद्यालयात प्राध्यापक अतिरिक्त ठरणार नाहीत. विविध उपक्रम राबविण्यासाठी प्राध्यापक लागणारच आहे. ही सर्व बाब विचारात ठेवूनच अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, असे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी स्पष्ट केले.
त्या महाविद्यालयांचा ताण वाढणार
नागपूर विभागात ४७ महाविद्यालये असून, १८ हजार २४० जागा आहेत. ‘कोरोना’मुळे महाविद्यालयांना आर्थिक भार सहन करावा लागत असून प्राध्यापकांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. काही महाविद्यालयांत तर आवश्यक संख्येत प्राध्यापक नाहीत. नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर उपक्रम राबविण्यासाठी प्राध्यापकांची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांतील सध्या कार्यरत प्राध्यापकांवर ताण वाढण्याची शक्यता आहे.