सराफांची लहान-मोठी दुकाने बंद होण्याची भीती : हालमार्किंग १६ जूनपासून अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 08:48 PM2021-05-26T20:48:02+5:302021-05-26T20:48:44+5:30

Hallmarking compulsary केंद्र सरकारने दागिन्यांसाठी संपूर्ण देशात हालमार्किंग १६ जूनपासून अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला आहे. त्यामुळे सराफांची लहान-मोठी दुकाने बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Fear of closure of small and big shops: hallmarking compulsary | सराफांची लहान-मोठी दुकाने बंद होण्याची भीती : हालमार्किंग १६ जूनपासून अनिवार्य

सराफांची लहान-मोठी दुकाने बंद होण्याची भीती : हालमार्किंग १६ जूनपासून अनिवार्य

Next
ठळक मुद्दे २४ कॅरेटचे दागिने मिळणार नाहीत

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारने दागिन्यांसाठी संपूर्ण देशात हालमार्किंग १६ जूनपासून अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला आहे. त्यामुळे सराफांची लहान-मोठी दुकाने बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आता ग्राहकांना केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटचे दागिने मिळणार आहे. विदर्भात सर्वाधिक विक्रीची २४ कॅरेट दागिने मिळणार नाहीत.

बीआयची लॅब नसलेल्या जिल्ह्यात हालमार्किंग अनिवार्य करू नये

पूर्वी १ मेपासून हालमार्किंग अनिवार्य केले होते; पण जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशनचे पुणे आणि नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई आणि नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना कोर्टाने १५ जूनपर्यंत भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) सराफांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. लॉकडाऊनमुळे सराफांची दुकाने बंद असल्याने हालमार्किंग अनिवार्य करण्याची प्रक्रिया पुढे ढकलल्याची मागणी असोसिएशनने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे आणि पीयूष गोयल यांच्याकडे केली होती. त्यानुसार देशातील दहा मोठ्या असोसिएशनच्या २० पदाधिकाऱ्यांशी झूम बैठक घेऊन अडीच तास चर्चा केली. या बैठकीत नागपुरातील असोसिएशनचे राजेश रोकडे यांनी भाग घेतला. बैठकीत गोयल यांनी १६ जूनपासून हालमार्किंग अनिवार्य करण्याचे सूतोवाच केले आणि तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची समिती बनविली. ही समिती चार दिवसांत अहवाल देणार आहे. ज्या राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये हालमार्किंग सेंटर नाहीत, त्या ठिकाणी हॉलमार्किंग अनिवार्य करू नये, अशी मागणी करण्यात आली.

सराफांना दंड व शिक्षेची तरतूद चुकीची

राजेश रोकडे म्हणाले, सराफा व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता केंद्र सरकारने हालमार्किंग अनिवार्य केले आहे. देशातील अनेक राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये हालमार्किंग सेंटर नाहीत. शिवाय हॉलमार्किंग केल्याशिवाय सराफांना दागिने विकता येणार नाहीत. विक्री केल्यास सराफांना दंड आणि शिक्षेची तरतूद कायद्यात केली आहे. जिथे बीआयएसची लॅब आहे, त्या ठिकाणीच हालमार्किंग बंधनकारक करावे. विदर्भात तीन लॅब असून, एक अकोला आणि दोन नागपुरात आहेत. विदर्भातील १० हजारांपेक्षा जास्त सराफा दागिन्यांचे हालमार्किंग कसे करतील, हा गंभीर प्रश्न आहे. नागपूर जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा जास्त सराफा व्यापारी आहे. एवढ्या संख्येनुसार नागपुरात दहा लॅब आणि प्रत्येक जिल्ह्यात एक वा दोन लॅब असायला हव्यात. सरकार सराफांना विश्वासात न घेता हॉलमार्किंग लागू करीत आहेत. यामुळे इन्स्पेक्टर राज वाढणार आहे.

Web Title: Fear of closure of small and big shops: hallmarking compulsary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं