मनपालाच कोरोनाची भीती : तीन मोठी इस्पितळे असताना रुग्णाना ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:44 PM2020-03-20T23:44:20+5:302020-03-20T23:45:20+5:30
बिकट स्थिती असतानाही मनपाच्या आरोग्य विभागाने आपल्या तीन मोठ्या इस्पितळांना कोरोनासाठी तयार केले नाही. धक्कादायक म्हणजे, मनपाकडे १४५ खाटा आहेत, येथे उपचार घेणारे आजच्या स्थितीत केवळ सहाच रुग्ण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूबाधितांची संख्या चार झाली आहे रोज १० वर संशयित रुग्ण आढळून येत आहे. यांच्यावरील उपचारासाठी मेडिकलमध्ये ४० तर मेयोमध्ये २० खाटांचा वॉर्ड आहे. या शिवाय सध्यातरी कुठलीही पर्यायी सोय नाही. खासगी इस्पितळांना ‘आयसोलेशन’ वॉर्ड तयार करण्याचा सूचना केल्या आहेत. परंतु यासाठीही कुणी सामोर आलेले नाही. बिकट स्थिती असतानाही मनपाच्या आरोग्य विभागाने आपल्या तीन मोठ्या इस्पितळांना कोरोनासाठी तयार केले नाही. धक्कादायक म्हणजे, मनपाकडे १४५ खाटा आहेत, येथे उपचार घेणारे आजच्या स्थितीत केवळ सहाच रुग्ण आहेत. त्यानंतरही आवश्यक सोयी नसल्याचे कारण सांगून मनपा आरोग्य विभाग हात वर करीत आहे.
महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पाेरेशन अॅक्टनुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर मनपाला पडल्याचे यावरून दिसून येत आहे.
मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात खाटांची संख्या ८० आहे. या रुग्णालयात केवळ सहा रुग्ण आहेत. या शिवाय, पाचपावली सुतिका गृह आहे. येथे खाटांची संख्या २५, तर इमामवाडा येथील आयसोलेशन वॉर्डात खाटांची संख्या ४० आहे. परंतु दोन्ही रुग्णालयात एकही रुग्ण नाही. विशेष म्हणजे, या रुग्णालयांच्या देखभालीपासून ते डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. रुग्णाला मात्र, याचा किती फायदा होतो, हा संशोधनाचा विषय आहे. अख्खे शहर कोरोना विषाणूच्या दहशतीत असताना एकही रुग्ण या इस्पितळात भरती करून घेतला जात नाही. यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचे सांगून मनपाचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे याकडे लक्ष देतील का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
व्हेंटिलेटरचा अभावाचे सोगं कधीपर्यंत
धक्कादायक म्हणजे, नागपुरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव असतानाच्या वेळीही मनपाने असेच हात वर केले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आमच्याकडे व्हेंटिलेटर व आवश्यक यंत्रणा नसल्याचे सोंग घेतले आहे.
खासगी इस्पितळांकडे मदत मागितली आहे
मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सुतिका गृह व आयसोलेशन वॉर्डात व्हेंटिलेटर, त्यांना चालविणारे तंत्रज्ञ नाहीत. यामुळे कोरोनाचे संशयित रुग्ण ठेवणे शक्य नाही. खासगी इस्पितळांकडे मदत मागितली आहे.
डॉ. भावना सोनकुसळे
आरोग्य उपसंचालक, मनपा