मृत्यूच्या भीतीने प्रबोधन थांबविणार नाही
By admin | Published: May 27, 2017 02:58 AM2017-05-27T02:58:03+5:302017-05-27T02:58:03+5:30
मुंबईत कशामुळे हल्ला झाला हे माहिती नाही, पण मृत्यूच्या भीतीने कधीच प्रबोधन कार्य थांबविणार नाही
सत्यपाल महाराजांचे प्रत्युत्तर : हल्लेखोर तरुणाला क्षमा केली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईत कशामुळे हल्ला झाला हे माहिती नाही, पण मृत्यूच्या भीतीने कधीच प्रबोधन कार्य थांबविणार नाही असे चोख प्रत्युत्तर राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी विरोधकांना दिले.
चाकू हल्ल्यानंतर ते शुक्रवारी प्रथमच नागपुरात आले होते. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधला. १२ मे रोजी नायगाव, मुंबई येथे कुणाल जाधव नामक तरुणाने महाराजांच्या पोटात चाकू भोसकला होता. त्यातून महाराज सुदैवाने बचावले.
पत्नीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण जीवन समाज प्रबोधनाला समर्पित केले. प्रबोधन सोडल्यास जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे प्रबोधन करताना येणाऱ्या मृत्यूसाठी मी सज्ज आहे अशी बेडर भूमिका महाराजांनी मांडली.
हल्ला करणारा तरुण समाज प्रबोधनाच्या विरोधात असावा. त्यामुळे त्याने हल्ला केला असावा असा अंदाज महाराजांनी व्यक्त केला. त्या तरुणाने हल्ला करण्याचे कारण सांगितले नाही. परिणामी आपण कुठे चुकलो हे कळले नसल्याने दु:ख वाटते असे महाराज म्हणाले. त्या तरुणाला कठोर शिक्षा व्हावी असे वाटत नसून त्याला क्षमा केल्याचे महाराजांनी सांगितले. या हल्ल्यामागील मास्टरमाईन्ड नक्कीच मनुवादी व कर्मकांडी आहे. तो कोण आहे हे चौकशीतून पुढे येईल असे मत महाराजांनी कोणावरही आरोप करण्याचे टाळून व्यक्त केले.
त्या मुलीच्या धाडसाचे स्वागत
अलीकडेच एका मुलीने लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू साधूचे लिंग चाकूने कापले. त्या मुलीच्या धाडसाचे महाराजांनी स्वागत केले. संबंधित साधू पीडित मुलगी व त्या मुलीच्या आईचे अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण करीत होता. अत्याचार असह्य झाल्यानंतर मुलीने साधूचे लिंग कापले. महाराजांनी मुलीच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी सर्वांना टाळ्या वाजवायला लावल्या.
हल्ल्यावर चिंतन बैठक
समाज प्रबोधनकारांवर भविष्यामध्ये असे हल्ले होऊ नये यावर चिंतन करण्यासाठी सुभाष रोडवरील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात बैठक झाली. बैठकीत सत्यपाल महाराजांसह श्री गुरुदेव सेवा मंडळ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मुस्लीम मराठी साहित्य परिषद, बुद्ध धर्म संस्कार केंद्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुद्धविहार समन्वय समिती, ग्राम संरक्षण दल, सर्वोदय मंडळ इत्यादी संस्थांचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी मिळून सत्यपाल महाराज हल्ला निषेध समितीही स्थापन केली आहे.