यंदाच्या दिवाळीत उपराजधानीत प्रदूषणाचा उच्चांक होण्याची भीती; एक्यूआरने ओलांडली धोक्याची पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 07:00 AM2021-11-04T07:00:00+5:302021-11-04T07:00:07+5:30
Nagpur News यावर्षी उपराजधानीत फटाक्यांची आतषबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आधीच हवा गुणवत्ता इंडेक्स (एक्युआय) धोक्याचा स्तर पार करून १५१ वर पोहोचला आहे. त्यातच फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर तिपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे लोकांना मनाप्रमाणे सण, उत्सव साजरे करता आलेले नाहीत. मात्र, यावर्षी परिस्थिती सुधारली आहे. अशावेळी दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे यावर्षी फटाक्यांची आतषबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आधीच हवा गुणवत्ता इंडेक्स (एक्युआय) धोक्याचा स्तर पार करून १५१ वर पोहोचला आहे. त्यातच फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर तिपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दिवाळी आली की कमी फटाके फोडण्याचे आवाहन सर्वच प्रशासकीय संस्थांकडून केले जाते. लोकांमध्ये याबाबत जागृती होत असली तरी बहुतेकांचा फटाक्यांचा मोह सुटत नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात प्रदूषणाच्या स्तरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. नागपूरच्या वातावरणातील सर्वाधिक प्रदूषित घटक म्हणून धुलीकण म्हणजे 'पार्टिकुलेट मॅटर' (पीएम - २.५ व पीएम - १०)चा समावेश आहे. विकास प्रकल्प, उद्योग तसेच बांधकामात वाढ झाल्याने त्याचे प्रमाण वाढले आहे. फटाक्यांमुळे धुलीकणांत वाढ तर होतेच, शिवाय सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, लेड, निकेल, आर्सेनिक, ओझोन ३ व इतर घटकांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येते.
२०१३ पासून सातत्याने वाढ
२०१३ मध्ये दिवाळीत पीएम - १०चे प्रदूषण सदरमध्ये सर्वाधिक २३४ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर (एमपीसीएम) होते. २०१४ मध्ये उत्तर अंबाझरी मार्गावर २३४ एमपीसीएम व सदर भागात २७० एमपीसीएम होते. २०१५मध्ये हा स्तर उत्तर अंबाझरी मार्गावर स्टॅन्डर्ड स्तराच्या तिप्पट म्हणजे ३०५ एमपीसीएमवर पोहोचला होता. दिवाळीनंतरच्या दुस?्या दिवशी २११ एमपीसीएम होता. २०१६मध्ये सिव्हील लाईन्स, अंबाझरी व सदर भागात अनुक्रमे १६१, १३५ व १७५वर होता. २०१७मध्ये फटाक्यांमुळे पाचपट वाढ झाली व ५०० एमपीसीएमवर पोहोचल्याची नोंद आहे.
एअर क्वालिटी इंडेक्समध्ये वाढ
- २०१६मध्ये एक्युआय १३८, २०१७मध्ये १८२, २०१८मध्ये २२२, २०१९मध्ये ११५ तर २०२०मध्ये १६८ एक्युआय.
- पीएम - २.५ २०१७मध्ये ५०.२ एमपीसीएम, २०१८मध्ये ४६.६ एमपीसीएम, २०१९मध्ये ४७.२ एमपीसीएम.
रात्री ८ ते १० ची मुदत निष्प्रभ
२०१९ साली केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाने फटाक्यांवर नियंत्रणासाठी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्याची मुदत दिली होती. मागील वर्षी हे निर्देशही निष्प्रभ ठरले. रात्री ८ पूर्वीच सुरू झालेली आतषबाजी उशिरा रात्री २.३०पर्यंत चालली.
नीरी ठेवणार नजर
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) दरवर्षीप्रमाणे यावेळीही दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतरच्या प्रदूषण स्तरावर व त्यातील घटकांवर नजर ठेवणार आहे.