धास्ती वाढली, बिबट्या महाराजबागेजवळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 10:50 PM2021-05-31T22:50:47+5:302021-05-31T22:51:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तीन दिवसांपूर्वी आयटी पार्क परिसरातील गायत्री नगरात दिसलेला बिबट्या आता चक्क महाराजबागेजवळ पोहोचला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन दिवसांपूर्वी आयटी पार्क परिसरातील गायत्री नगरात दिसलेला बिबट्या आता चक्क महाराजबागेजवळ पोहोचला आहे. सोमवारी दुपारी तो एका महिला कामगाराला पुलाच्या कठड्यालगतच्या भिंतीवर बसलेला दिसला. विशेष म्हणजे हे ठिकाण महाराजबागेला अगदी लागून आहे. त्याच्या शोधासाठी तातडीने मोहीम राबविली. मात्र त्याचे लोकेशन मिळाले नाही. त्याला पकडण्यासाठी महाराजबागेत आणि अन्य ठिकाणी मिळून ४ पिंजरे लावण्यात आले आहेत.
पंजाबराव कृषी विद्यापीठात काम करणाऱ्या आशा निखार नामक कामगार महिलेला दुपारी ३.२० वाजता नवीन १२ मीटर सिमेंट रोडवरील पुलाच्या कठड्यालगतच्या भिंतीवर बिबट्या बसलेला दिसला. हे लक्षात येताच ती घाबरली. तिने ही माहिती तातडीने तिच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना दिली. वनविभागाला ही माहिती कळवताच तातडीने पथक पोहोचले. सोबत ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचा चमूही होता. मात्र, शोध घेऊनही बिबट्या दिसला नाही. नाल्याच्या बाजूने त्याचे पायाचे ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच मागमूस न लागल्याने तो नेमका कोणत्या भागाकडे वळला असावा, याचा अंदाज कोणालाही आला नाही. घटनास्थळाला सहाय्यक वनसंरक्षक काळे, हिंगणाचे वनपरिक्षेत्राधिकारी निनावे, सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे, ट्रान्झिट सेंटरचे कुंदन हाते आदींनी भेट देऊन पाहणी केली.
...
महाराजबागेमध्ये दक्षता
बिबट्या दिसलेले ठिकाण अगदी महाराजबागेलगतच म्हणजे मोगली गार्डनजवळ आहे. त्यामुळे तो बागेतही शिरकाव करण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेऊन तेथील सुरक्षा वाढविली आहे. सायंकाळी तातडीने पिंजरा लावण्यात आला. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. रात्रपाळीतील चौकीदार वाढविण्यात आले असून स्टफही वाढविला आहे. महाराजबागेत माकडांची संख्या अधिक आहे. एन्क्लोजरमध्ये हरिण तसेच काळवीट, नीलगाय आदी प्राणीही आहेत. नाल्याच्या परिसरात डुकरांची संख्या अधिक असून बेवारस कुत्रेही भरपूर आहेत. नाला, थंडावा, दाट झाडी यामुळे बिबट्या या परिसरात रमण्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे महाराजबागेतील पिंजऱ्यात मादी बिबट्याही आहे.
...
चार पिंजरे लावले
बिबट्याचा या परिसरात आढळलेला वावर लक्षात घेता या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच, चार पिंजरेही लावले आहेत. एक पिंजरा महाराजबागेत लावला असून दोन पिंजरे पंजाबराव कृषी महाविद्यालय आणि विश्रामगृह परिसरात लावले आहेत. तर एक पिंजरा व्हीएनआयटी परिसरात लावला आहे.
...
धोका वाढला
या परिसरात बिबट्या आल्याने धोका अधिक वाढला आहे. नाल्यालगतचा परिसर वर्दळीचा आहे. रात्रीही या मार्गावरून वाहतूक असते. सध्या लॉकडाऊनमुळे वर्दळ बरीच कमी झाली, हे यात एक समाधान आहे. येथे लागूनच तीन नाले आहेत. एक फुटाळाकडून आलेल्या आरटीओ कार्यलयाजवळ क्रॉस होणारा नाला, बजाज नगरकडून येणारा नाला आणि आमदार निवासकडून येणारा नाला अशा तीनही नाल्यांना लागून वस्तीही आहे. यामुळे त्याला पिंजऱ्यात पकडणेही जोखमीचे आहे. परिसरात बेवारस कुत्री, झोपडपट्टी परिसरात पाळलेल्या कोंबड्या, डुकरांची संख्या अधिक असल्याने बिबट्यापासून धोका वाढला आहे.
...