एसटीपासून चार हात दूरच बरे; लाल परी की धारदार सुरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 03:34 PM2022-10-10T15:34:31+5:302022-10-10T15:37:54+5:30

दोर आणि तार बांधून धावतात बसेस : बुलडाण्यातील अपघातापासून धडा घेण्याची गरज

Fear of accident due to broken bus sheet, need to learn from Buldana bus accident | एसटीपासून चार हात दूरच बरे; लाल परी की धारदार सुरी?

एसटीपासून चार हात दूरच बरे; लाल परी की धारदार सुरी?

googlenewsNext

नागपूर : तीन आठवड्यांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे तीन व्यक्ती गंभीर जखमी, तर दोघांचे हात खांद्यापासून वेगळे झाले होते. सर्वत्र दहशत निर्माण करणाऱ्या या अपघातानंतर एसटी महामंडळात आणि प्रवाशांतही चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर, एसटीच्या नागपूर विभागाने बसेसच्या बाह्यदर्शनी भागाच्या देखरेखीवर नजर केंद्रित केली आहे. ज्या बसचे पत्रे उचकटले आहेत, अशा पत्र्यांना ठीक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यांचे जीवनच उद्ध्वस्त

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पिंपळगाव देवी दरम्यान मलकापूर आगाराच्या एसटी बसने तिघांना गंभीर जखमी केले होते. बसचा उचकटलेला धारदार पत्रा लागल्याने दोघांचे हात शरीरापासून वेगळे झाले होते. काहीही दोष नसताना १६ सप्टेंबरला झालेल्या या अपघातामुळे या बिचाऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.

अशी घटना पुन्हा घडायला नको

एसटी बसची योग्य ती देखभाल संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली नाही. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची किंमत त्या निर्दोष व्यक्तींना चुकवावी लागली. त्यामुळे पुन्हा असा अक्षम्य दुर्लक्षितपणा एसटी महामंडळाकडून होऊ नये, अशी संतप्त प्रतिक्रिया वजा अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

‘लोकमत’ने काय पाहिले?

दोर आणि तार बांधून धावतात बस !

'लोकमत'ने या संबंधाने बसस्थानकाची पाहणी केली असता, काही बसचे पत्रे दोर आणि तार बांधून अर्थात जुजबी उपाययोजना करून धावत असल्याचे दिसून आले. गणेशपेठ बसस्थानकावर येणाऱ्या काही बसेसच्या कापलेल्या पत्र्यावर ठिगळ लावून असल्याचेही दिसून आले. बसेसची ही स्थिती चांगली नाही. प्रवासादरम्यान तो भाग तुटून खाली पडला तर अपघात घडू शकतो.

जखमा झाल्यास जबाबदार कोण ?

अनेक बसच्या पत्र्यांचा भाग उचकटलेला दिसतो. सीट जोडणाऱ्या अँगल किंवा बोल्टचे खुबेही बाहेर असतात. त्यामुळे प्रवाशांना दुखापत होण्याची भीती असते. प्रवाशांना जखम झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न अमरावतीच्या उमा रमेश मेंढे यांनी विचारला आहे.

चालकांकडून होतो हलगर्जीपणा

अनेकदा बसचालक हलगर्जीपणा करतो. पुराचे पाणी पुलावर वाहत असताना बस दामटण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावर ब्रेकर आणि खड्डा दिसत असूनही गती कमी करण्यापेक्षा बसचालक वेगात बस दामटतो. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना जखमा होतात, असे मयुर सांबरे (उमरेड) यांनी आपला अनुभव कथन करताना म्हटले आहे.

नागपूर विभागातील बस चांगल्या

बुलडाणा जिल्ह्यात झालेला अपघात दु:खद आहे. तो ध्यानात घेता सर्वच बसच्या बाह्य भागाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी एक विशेष अधिकारीच नियुक्त करण्यात आला आहे. तुलनेत नागपूर विभागातील बसेसची स्थिती चांगली आहे. ज्या त्रुट्या आहेत, त्या दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

किशोर आदमने, प्रभारी विभाग नियंत्रक, एसटी, नागपूर

Web Title: Fear of accident due to broken bus sheet, need to learn from Buldana bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.