कुलगुरूंच्या फायलींना हात लावण्याची वाटते भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:48 PM2021-05-12T22:48:48+5:302021-05-12T22:50:49+5:30
Nagpur university राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला कोरोनाचा मोठा फटका बसला असून, अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. खुद्द कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनादेखील कोरोनाची बाधा झाली असून, तेदेखील होम आयसोलेशनमध्ये आहेत. ते घरूनच काम करत असून, यामुळेच अनेक कर्मचारी धास्तीत आहेत. त्यांनी सही करून पाठविलेल्या फायलींना हात लावण्याची भीती वाटत असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये भावना असून, कुलगुरूंनी सध्या प्र. कुलगुरूंना चार्ज दिला पाहिजे, असा सूर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला कोरोनाचा मोठा फटका बसला असून, अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. खुद्द कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनादेखील कोरोनाची बाधा झाली असून, तेदेखील होम आयसोलेशनमध्ये आहेत. ते घरूनच काम करत असून, यामुळेच अनेक कर्मचारी धास्तीत आहेत. त्यांनी सही करून पाठविलेल्या फायलींना हात लावण्याची भीती वाटत असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये भावना असून, कुलगुरूंनी सध्या प्र. कुलगुरूंना चार्ज दिला पाहिजे, असा सूर आहे.
कुलगुरू कोरोनाबाधित असून, त्यांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे ते घरूनच काम करत आहेत. महत्त्वाच्या फायली त्यांच्या घरी ते बोलावून घेत असून, तेथूनच दुसऱ्या दिवशी ते सही करून विद्यापीठात पाठवत आहेत. मात्र त्या फायलींना सॅनिटाईज कसे करायचे आणि त्या हाताळल्यानंतर आम्हाला तर कोरोनाची बाधा होणार नाही ना, अशी भीती कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाटत आहे. याशिवाय जे कर्मचारी त्यांच्या निवासस्थानी जात आहेत, त्यांनादेखील धास्ती आहे. यासंदर्भात कुलगुरूंकडे कुणीही बोललेले नाही. मात्र, विद्यापीठ वर्तुळात यासंदर्भात चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील कर्मचारी संजय भोंगाडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. याअगोदरदेखील काही कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा फोन नॉट रिचेबल होता.
प्र. कुलगुरूंकडे चार्ज का नाही
कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना कुलगुरूंच्या निर्देशांनुसार विद्यापीठाने ९ एप्रिल रोजी परिपत्रक जारी केले होते. यानुसार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी हरतऱ्हेने काळजी घ्यावी. तसेच घरी कुणी बाधित असेल तर वर्क फ्रॉम होम करावे, असे त्यात नमूद होते. कुलगुरू वर्क फ्रॉम होम तर करत आहेत. मात्र, फायलींमुळे इतरांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरू प्र.कुलगुरूंकडे चार्ज देऊ शकतात. सध्याची स्थिती लक्षात घेता ते प्र. कुलगुरूंकडे चार्ज का देत नाहीत, असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात असल्याची माहिती कर्मचारी संघटनेशी संबंधित एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.