व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसीची घरोघरी भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:07 AM2021-01-17T04:07:47+5:302021-01-17T04:07:47+5:30
नागपूर : सोशल मीडियावर जगात सर्वात सक्रिय असलेल्या व्हाॅट्सअॅपने एक नवी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली आहे. यात व्हॉट्सअॅपचा ...
नागपूर : सोशल मीडियावर जगात सर्वात सक्रिय असलेल्या व्हाॅट्सअॅपने एक नवी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली आहे. यात व्हॉट्सअॅपचा सर्व डाटा फेसबुक व फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर शेअर केला जाणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा धसका भारतातील अनेक व्हॉट्सअॅप युझर्सनी घेतला आहे. आपण व्हॉट्सअॅपवर काय काय शेअर केले याचा सर्व फ्लॅशबॅक युझर्सच्या डोळ्यापुढे तरंगायला लागला आहे. खासगीतले हे सर्वकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर तर येणार नाही ना, अशी भीती अनेकांना वाटायला लागली आहे. अनेकजण आता व्हॉट्सअॅपला दुसरा पर्याय शोधायला लागले आहेत. पण सायबर एक्सपर्टनी व्हॉट्सअॅप युझर्सना काळजी करू नका, असा सल्ला दिला आहे.
- व्हॉट्सअॅपवरील कुठलीही वैयक्तिक चॅटिंग, शेअर केलेले फोटो अथवा जो काही आपल्याला भीतीदायक वाटत असेल असा कुठलाही डाटा शेअर होणार नाही. कंपनी फक्त व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाचा असलेला डाटा शेअर करणार आहे. फेसबुक याचा वापर अॅडव्हरटायजिंगच्या दृष्टीने वापर करणार आहे. मेसेजमधील कुठल्याही कंटेन्टला पब्लिकली लीक करणार नाही. आतापर्यंत या कंपन्या डाटा शेअर करीतच आल्या आहेत. व्हॉट्सअॅपने ते अधिकृत केले आहे.
- तेजस अंजनकर, सायबर एक्सपर्ट
- खरे तर कुठल्याही सोशल मीडियामध्ये तुम्ही शेअर केलेला डाटा हा हॅक झालेलाच आहे. सोशल मीडियावरील कंपन्या जो डाटा शेअर करणार आहे, तो वैयक्तिक करणार नाही. व्यवसायाशी निगडित डाटा ते शेअर करणार आहेत. या कंपन्या पूर्वीही तुमचा डाटा वापरतच होत्या. त्या फक्त आता तुम्हाला सांगून वापरत आहेत. तुमच्या मनात जे काळेबेरे चालले आहे ते समाजमाध्यमात येईल अशी जी भीती तुम्हाला आहे, ते बिलकूल होणार नाही.
महेश रखेजा, सायबर एक्सपर्ट
- अनेक व्हॉट्सअॅप युझर्स आता दुसरा पर्याय शोधायला लागले आहेत. पण सोशल मीडियाचा कुठलाही प्लॅटफॉर्म हा सुरक्षित नाही. व्हॉट्सअॅपने कमर्शियल डाटा शेअर करणार असे म्हटले आहे. मुळात सर्वच सोशल मीडियाचा बिझनेस मॉड्यूल सारखाच आहे. करोडो युझर्स असलेल्या कंपन्यांना तुमची वैयक्तिक माहिती लीक करण्यात काही रस नाही. मुळात व्हॉट्सअॅपच्या निर्णयामुळे सोशल मीडियातील युझर्सना स्वत:च्या डाटाबद्दल एक जागरूकता निर्माण झाली आहे. सरकारच्या दरबारात पडलेले डाटा प्रायव्हेसी प्रोटेक्शन बिल यावरून चर्चेत आले आहे. खरे तर सोशल मीडियाचा वाढलेल्या अतिरेकामुळे ‘माय डाटा माय राईट’ ही मूव्हमेंट सुरू व्हायला पाहिजे. आपल्या डाटाचा गैरवापर होऊ शकतो याचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे. पण खरे सांगायचे म्हणजे सोशल मीडियावरील सर्वच पर्याय सारखेच आहेत.
अॅड. महेंद्र लिमये, सायबर अवेअरनेस ऑर्गनायझेशन