कोरोनाच्या भीतीने तिरडीला खांदेकरीही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:28+5:302021-05-08T04:09:28+5:30
कुही : कोरोनाने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शेजारचा एखादा माणूस मृत झाला तरी त्याला कुणीही पाहायलासुद्धा जात ...
कुही : कोरोनाने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. शेजारचा एखादा माणूस मृत झाला तरी त्याला कुणीही पाहायलासुद्धा जात नाही. एवढेच काय तर त्याच्या तिरडीला साधे खांदेकरी मिळेनासे झाले आहेत. शेवटी मृतकाचे पार्थिव स्मशानभूमीत पोहचविण्यासाठी ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागतो.
मांढळ येथील वाॅर्ड क्र. २ मध्ये कचरा वेचणाऱ्या रामू चव्हाण यांची पत्नी सविता चव्हाण (३५) हिचा बुधवारी अल्प आजाराने मृत्यू झाला. मात्र, कोरोनाच्या भीतीने कुणीही तिला पाहायला गेले नाही. तिच्या अंत्यसंस्काराची वेळ आली. परंतु, कुणीही पुढे येत नव्हते. ग्रामपंचायत सदस्य राजेश तिवस्कर यांनी पुढाकार घेऊन तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र, त्यांच्या मदतीला वाॅर्डातील कोणीही आलेले नाही. शेवटी त्यांनी विटांच्या भट्टीवरील दोन माणसांना सोबत घेतले व आपल्याच ट्रॅक्टरवर सविता हिचे पार्थिव स्मशानभूमीत नेत अंत्यसंस्कार पार पाडले.
भारतीय संस्कृतीप्रमाणे कुणी आपला विरोधकही असेल तरी त्याच्या तोरणी किंवा मरणी हजर राहावे, अशी रीत आहे. शत्रू असेल तरी मृत्यूनंतर विरोध संपला, असे समजून अंत्यविधीला जातात. मात्र कोरोनाने भारतीय संस्कृतीतील या चांगल्या परंपरेला अडसर निर्माण करणारी परिस्थिती आणली आहे. एकीकडे लग्न व अंत्यविधीतील गर्दीतून संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने काही नियम कडक केले आहेत. मात्र, आपल्याला संसर्ग होईल, या भीतीने जवळचे लोक ही मृतदेहाजवळ येत नाही, ही वास्तविकता आहे. मागील आठवड्यात चिकणा येथे एकाचे वृद्धापकाळाने निधन झाले. खांदेकरी न मिळाल्याने घरच्यांनी पार्थिव बैलबंडीत टाकून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडले. यावर ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण कळंबे यांनी खेद व्यक्त केला. जी व्यक्ती बाधित नसेल, नैसर्गिक आजाराने मृत्यू झाला असेल, त्याही व्यक्तीजवळ जाण्यास कुणी तयार नाहीत. सामाजिक रुढीप्रमाणे ग्रामीण भागात बांबूची तिरडी करून त्यावर पार्थिव ठेवत स्मशानभूमीपर्यंत खांदेकरी नेतात. मात्र, कोरोनाच्या भीतीने खांदेकरी मिळत नाही, हे वास्तव आहे.