पकडले जाण्याच्या भीतीने खाडेंनी काढला नागपुरातून पळ, ‘लोकमत’च्या वृत्तामुळे आरटीओत भूकंप
By नरेश डोंगरे | Published: March 10, 2023 09:10 PM2023-03-10T21:10:48+5:302023-03-10T21:10:58+5:30
अमरावती, यवतमाळसह अनेक ठिकाणची बोलणी फिस्कटली, आजी माजी मंत्र्यांसह ‘ठाण्या’च्या नावाचाही वापर?
नागपूर : आरटीओत इच्छित ठिकाणी बदली करून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची डील करण्याचे प्रयत्न करणाऱ्या रॅकेटमधील दलालांनी थेट सत्तापक्षातील एका शिर्षस्थ नेत्यासह अनेक आजी- माजी मंत्र्यांची नावे घेतल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने हे खळबळजनक प्रकरण चव्हाट्यावर आणल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटले असून राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भूकंप आल्यासारखे झाले आहे. यामुळे अमरावती, यवतमाळचा दाैरा होऊनही या रॅकेटसोबत झालेली बोलणी फिस्कटल्याची माहिती चर्चेला आली आहे.
आरटीओतून निवृत्त झालेल्या लक्ष्मण खाडे नामक अधिकाऱ्याने सरकारकडून बदल्यांची फ्रेण्चाईजी मिळवल्याच्या थाटात आरटीओतील बदलीपात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना निरोप पाठवून त्याच्या ठिकठिकाणी भेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. बुधवारी नागपुरात त्याने असेच केले. बदलीपात्र अधिकाऱ्यांसोबत खाडे सेंटर पॉईंटमध्ये चर्चा वजा डील करीत असताना तेथे कल्याणमधील पवार नामक व्यक्तीही हजर होते अन् तेसुद्धा इच्छुकांना खाडेच्या सुरात सूर मिळवून बदलीची हमी देत होते, ही मंडळी आजी- माजी मंत्र्यांसह थेट ‘ठाण्या’चेही नाव घेत होती, अशी सूत्रांची माहिती आहे. या ‘अर्थपूर्ण भेटीगाठी’ची कुणकुण लागल्यामुळे तेथे काही अधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते पोहाेचले. त्यामुळे खाडे अन् त्यांच्या सहकाऱ्यांनी लगबगीने हॉटेल सोडून नागपुरातून पलायन केल्याची चर्चा आता रंगली आहे.
चार मेसेज, १८ जणांची नावे!
‘लोकमत’ने गुरुवारी संशयास्पद बैठकीचे तर शुक्रवारच्या अंकात बैठकीशी संबंधित संभाषण (ऑडिओ क्लीप) शब्दश: प्रकाशित केल्यामुळे राज्याच्या परिवहन विभागात भूकंप आल्यासारखे झाले आहे. त्यामुळे नवी माहितीही पुढे येत आहे. त्यानुसार, खाडे यांनी काहींच्या मोबाइलवर चार मेसेज केले. त्यात नागपूर शहरातील सात, नागपूर शहर पूर्वमधील एक, नागपूर ग्रामीणचे तीन, भंडारा येथील तीन आणि गोंदियातील चार अशा एकूण बदलीपात्र १८ जणांची नावे पाठविली. त्यांच्यापैकी किती जणांसोबत त्यांची बैठक अथवा चर्चा झाली ते स्पष्ट झाले नाही.
खाडेंचे संभाषण अन् मंत्र्यांची नावे
आरटीओतील बदल्या अन् संशयास्पद बैठक तसेच या बैठकीशी संबंधित आरटीओतील दोन अधिकाऱ्यांचे संभाषण (ऑडिओ क्लीप) ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर हादररेल्या परिवहन विभागातून आज नवी माहिती पुढे आली आहे. खाडे आणि अन्य एका जणाची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. त्यात नागपुरात खासगी कामासाठी आलो होतो. हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये थांबलो होतो. सोबत राहुल पवार होते, असे खाडेंनी म्हटले आहे. (कल्याण आरटीओमध्ये राहुल पवार नामक एक अधिकारी कार्यरत आहेत, हे विशेष!) नागपुरातील महिला अधिकाऱ्यासह दोघांसोबत भेट झाल्याचे खाडे यांनी म्हटले आहे. आपली अनेकांसोबत ओळख असल्याचे सांगून खाडे यांनी या संभाषणात दोन माजी मंत्र्यांचीही नावे घेतली आहे.
परिवहन आयुक्त म्हणतात...
या संबंधाने प्रस्तूत प्रतिनिधीने परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याशी संपर्क केला असता आपण हे प्रकरण वृत्तपत्रात वाचले. संभाषणाची क्लीप आपल्यापर्यंत अद्याप पोहाेचली नाही. सध्या मी हाऊसमध्ये आहे, त्यामुळे फार बोलता येणार नसल्याचे ते म्हणाले.