निर्भयपणे, शांततेत मतदान करा : पोलीस आयुक्त
By Admin | Published: February 21, 2017 02:01 AM2017-02-21T02:01:10+5:302017-02-21T02:01:10+5:30
महापालिका निवडणुकीच्या संबंधाने शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची कुठे गडबड होणार नाही, ....
नागपूर : महापालिका निवडणुकीच्या संबंधाने शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची कुठे गडबड होणार नाही, याची पोलिसांनी काळजी घेतली असून, नागरिकांनी निर्भयपणे आणि शांततेने मतदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले.
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान केले जाणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी उपराजधानीतील विविध भागात २७८३ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त राहणार असून, बंदोबस्तासाठी ९ पोलीस उपायुक्त , १२ सहायक आयुक्त, ३२ पोलीस निरीक्षक , १२५ उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षक तसेच महिला आणि पुरुष असे एकूण ४९२५ पोलीस कर्मचारी, १५०० होमगार्ड, ३ राज्य राखीव दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
ऐनवेळी कुठे काही अनुचित घटना घडल्यास शीघ्र कृती दलाची १० पथके सज्ज ठेवण्यात आली असून १२ सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक आणि ९६ जवानांसोबत नियंत्रण कक्षात चार राखीव पोलीस पथके आणि राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात ठेवण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळपासूनच पोलिसांची गस्ती पथके विविध भागात गस्त घालत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कशाचीही भीती न बाळगता शांततेत मतदान करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. कर्तव्य बजावतानाच जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपण स्वत: सिव्हिल लाईनमध्ये मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे डॉ. व्यंकटेशम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.(प्रतिनिधी)