गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण व्हावा : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:48 PM2020-02-06T22:48:39+5:302020-02-06T22:50:05+5:30
युवतीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना अत्यंत संवेदनशील आहे. सरकारनेही गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण होईल, अशी तातडीने कारवाई करावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवतीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना अत्यंत संवेदनशील आहे. महिला सुरक्षेचा हा गंभीर विषय आहे. सरकारने यात अधिक लक्ष घालावे. पोलिसांनीही अधिक वेगाने तपास करावा. सरकारनेही गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण होईल, अशी तातडीने कारवाई करावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
या जळीत प्रकरणातील तरुणीवर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी रुग्णालयात जाऊन तरुणीची भेट घेतली आणि तिच्या नातेवाइकांना भेटून धीर दिला. तिच्यावर उपचारासाठी प्रयत्नांंची शर्थ सुरू आहे. तिच्या मदतीसाठी आवश्यकता असल्यास आम्हाला किंवा सरकारला सांगावे. सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन त्यांनी तिच्या कुटुंबीयांना यावेळी दिले.
या संदर्भात माध्यामांशी बोलताना ते म्हणाले, हा राजकारणाचा विषय नाही. नराधमाला तात्काळ शिक्षा व्हावी, अशी कुटुंबीयांची इच्छा आहे. अशा प्रकरणात फास्ट ट्रॅक खटला चालविला जावा. आरोपीला अशा प्रकरणात फाशीची शिक्षा दिली तरीही ती कमीच आहे. महिला सुरक्षेचा विषय अत्यंत संवेदनशील असून सरकारने तो लक्ष घालून हाताळावा. आमचे सरकारला संपूर्ण सहकार्य राहील, असे ते म्हणाले.