पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा लवकरच फिजिबिलिटी रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 09:23 PM2023-02-20T21:23:04+5:302023-02-20T21:26:15+5:30
Nagpur News एमआयडीसीने फिजिबिलिटी रिपोर्ट (व्यवहार्यता अहवाल ) तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची कंपनी इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड यांच्याकडे सोपविली आहे. ही कंपनी एमआयडीसीला सहकार्य करून चार महिन्यांत काम पूर्ण करणार आहे.
नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सची स्थापना करण्यासंदर्भातील घडामोडी सुरू झाल्या आहेत, यासाठी नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. एमआयडीसीने फिजिबिलिटी रिपोर्ट (व्यवहार्यता अहवाल ) तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची कंपनी इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड यांच्याकडे सोपविली आहे. ही कंपनी एमआयडीसीला सहकार्य करून चार महिन्यांत काम पूर्ण करणार आहे.
विशेष म्हणजे, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी कुठल्याही प्रकारच्या हालचाली नाही. दुसरीकडे नागपूरसाठी इच्छुक कंपनीसोबत मध्य प्रदेश सरकारने करार केला आहे. या कंपनीने छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर येथे जागा निश्चित केल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. दरम्यान, एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत.
तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २९ जून, २०२१ रोजी विदर्भात रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पुढे त्यानुसार कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. दरम्यान, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी यांनी चंद्रपुरात घोषणा करताना रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील प्रस्तावित ६० एमटीपीए क्षमतेच्या रिफायनरीसह पेट्रोकेमिकल रिफायनरीला प्रत्येकी २० एमटीपीएमध्ये विभाजीत करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
रिफायनरीसोबतच आले कॉम्प्लेक्स
फिजिबिलिटी रिपोर्ट सादर करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, रिफायनरीचे विशेषज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स रिफायनरीसोबतच उभारण्यात यावे, अशी भूमिका मांडली आहे. कॉम्प्लेक्ससाठी इथेन, नाप्ता व नैसर्गिक गॅसचा पुरवठा आवश्यक आहे. हे रिफायनरीच्या माध्यमातूनच उपलब्ध होते. रिफायनरीसह येथे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यात आले, तर विदर्भाचा सामाजिक व आर्थिक विकास शक्य असल्याचे माहेश्वरी म्हणाले.