नागपुरात गरिबीला कंटाळून तरुणाने मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 09:11 PM2020-07-18T21:11:17+5:302020-07-18T21:12:40+5:30

आई आणि बहिणीचा आधार असलेल्या एका तरुणाने आर्थिक कोंडी आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. पुरुषोत्तम रामराव भेंडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. त्याने मृत्यूला कवटाळून स्वत:ची सुटका करून घेतली.

Fed up with poverty in Nagpur, the young man embraced death | नागपुरात गरिबीला कंटाळून तरुणाने मृत्यूला कवटाळले

नागपुरात गरिबीला कंटाळून तरुणाने मृत्यूला कवटाळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आई आणि बहिणीचा आधार असलेल्या एका तरुणाने आर्थिक कोंडी आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. पुरुषोत्तम रामराव भेंडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. त्याने मृत्यूला कवटाळून स्वत:ची सुटका करून घेतली. त्याच्या आत्मघाती कृत्याने त्याची आई आणि छोट्या बहिणीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पाचपावलीतील बांगलादेश परिसरात भेंडे किराणा दुकानाजवळ पुरुषोत्तम राहत होता. त्याला एक छोटी बहीण आणि आई आहे.
पितृछत्र केव्हाच हरविल्यामुळे पुरुषोत्तमच घरातील कर्ता माणूस होता. वृद्ध आई आणि बहिणीचा तो एकमात्र आधार होता. मिळेल ती मोलमजुरी करून हे तिघे दिवस ढकलत होते. लॉकडाऊनमुळे घरोघरचे काम बंद झाले. त्यामुळे हे तिघे अत्यंत हलाखीचे जीवन जगत होते. रोजगार मिळत नसल्यामुळे आणि हातात पैसा नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तो त्याची आई आणि बहीण रोज काम शोधत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी पुरुषोत्तमची आई आणि बहीण कुठे काम मिळते का, ते बघण्यासाठी घराबाहेर गेल्या. तेवढ्या वेळात गरिबीला कंटाळलेल्या पुरुषोत्तमने शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास गळफास लावून घेतला. आई आणि बहीण दुपारी ४ च्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना पुरुषोत्तम गळफास लावून दिसल्यामुळे त्यांनी एकच आक्रोश केला. आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. त्यांनी पाचपावली पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पुरुषोत्तमचा मृतदेह खाली उतरवून मेयो रुग्णालयात पाठवला. पंचनामा वगैरे केल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुरुषोत्तमच्या रूपातील आधार गेल्यामुळे त्याच्या आई आणि बहिणीला जबर मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सामाजिक संस्थांनी या निराधार मायलेकीला आधार द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Web Title: Fed up with poverty in Nagpur, the young man embraced death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.