लकीच्या अपंगत्वाला संवेदनेचे पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:48 AM2017-09-05T00:48:06+5:302017-09-05T00:48:33+5:30

अपंगत्व कुठलेही असो ते एकदा आले की शरीरातले त्राणच गळून पडते. जगण्याची इच्छा संपते अन् आत्मविश्वासाचा आलेख वेगाने घसरतो.

Feeling of sensation of Lucky Disability | लकीच्या अपंगत्वाला संवेदनेचे पंख

लकीच्या अपंगत्वाला संवेदनेचे पंख

googlenewsNext
ठळक मुद्दे९० अंशातील वाकडे पाय केले सरळ : मेयोत प्रमाणपत्रासाठी आलेल्या रुग्णाला जन्मभरासाठी दिलासा

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपंगत्व कुठलेही असो ते एकदा आले की शरीरातले त्राणच गळून पडते. जगण्याची इच्छा संपते अन् आत्मविश्वासाचा आलेख वेगाने घसरतो. अशाच एका निराश जीवाच्या आयुष्यात एक नवी उमेद पेरली गेली. त्याचा हरवू पाहणारा आत्मविश्वास परत मिळवून दिला गेला. हे प्रेरणादायी कार्य मेयोच्या अस्थिरोग विभागातील डॉक्टरांतील सामाजिक जाणीवेमुळे शक्य झाले.
अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी आलेल्या त्या मुलाचे जन्मभराचे अपंगत्वच दूर झाल्याने आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शासकीय रुग्णालयातील अव्यवस्था व दुरवस्थेबाबत नेहमीच चर्चा होते.
परंतु या परिस्थितीतही काही डॉक्टर सामाजिक जबाबदारीतून काम करीत असल्याने अशी रुग्णालये गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण ठरली आहेत. यातीलच एक इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो).
कांद्री कन्हान येथील रहिवासी असलेला १४ वर्षीय लकी प्रमोद चाफले त्या मुलाचे नाव. लकीचे दोन्ही पाय जन्माच्या काही वर्षानंतर ९० अंशात वाकडे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून नीट उभेही राहता येत नव्हते. पाचव्या वर्गापासून शाळाही सुटली. सेरेब्रल पाल्सीचा आजार, त्यात आलेल्या या अपंगत्वामुळे आई-वडील चिंतेत होते. शासनाची मदत मिळावी या हेतूने लकीच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी मेयो रुग्णालय पोहचले.
याचवेळी त्यांची गाठ अस्थिरोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. मारुती कोईचाडे व डॉ. फैजल मोहम्मद यांच्याशी पडली. डॉ. कोईचाडे यांनी लकीचे वाकडे पाय पाहून त्याच्या आई-वडिलांना चांगलेच फैलावर घेतले. लहानपणीच शस्त्रक्रिया केली असती तर आज हा मुलगा स्वत:च्या पायावर उभा असता. अपंगत्वाचे प्रमाणपत्राची गरज पडली नसती, या शब्दात त्यांनी रागवले. गरीब कुटुंबाला यातील काहीच कळत नव्हते. डॉ. फैजल यांनी पुढाकार घेत, मुलाला प्रमाणपत्राची गरज नाही त्याला शस्त्रक्रियेची गरज आहे, असे सांगून त्यांना संपूर्ण माहिती दिली. तरीही चाफले कुटुंब साशंकच होते. आपला लकी पुन्हा चालू शकेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. परंतु डॉक्टर म्हणतात म्हणून ८ आॅगस्ट रोजी लकीला भरती केले.
सर्व तपासण्या झाल्यावर डॉ. फैजल यांनी १८ आॅगस्ट रोजी डाव्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तर २३ आॅगस्ट रोजी डॉ. कोईचाडे यांनी दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेने त्याचे दोन्ही पाय सरळ झाले. सध्या तो रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये भरती आहे.
खांद्यावर बसून आलेला लकी चालत जाणार
लकी वडिलांच्या खांद्यावर बसून रुग्णालयात आला होता, आता तो स्वत:च्या पायावर चालत घरी जाणार, या जाणिवेने आई वडिलांचे चेहरे आनंदाने उजळले आहेत. लकीच्या आईच्या दृष्टिकोनातून हा ‘चमत्कार’च आहे. त्यांच्या आनंदात डॉक्टरांचे समाधान आहे. लकीला याबाबत विचारले असता त्याने मी सायकल चालविणार असे सांगून अश्रूलाच वाट मोकळी करून दिली. लकीवरील शस्त्रक्रियेत डॉ. पृथ्वीराज निस्ताने, डॉ. सौरभ विक्रम, डॉ. निखिल अढाव यांचेही योगदान राहिले.

Web Title: Feeling of sensation of Lucky Disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.