कस्तूरचंद पार्कवरच होणार गडकरी यांचा सत्कार
By admin | Published: May 14, 2017 02:14 AM2017-05-14T02:14:29+5:302017-05-14T02:14:29+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या २७ मे रोजी कस्तूरचंद पार्कवर आयोजित सत्काराच्या कार्यक्रमाची परवानगी
कार्यक्रमाला हायकोर्टाची परवानगी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या २७ मे रोजी कस्तूरचंद पार्कवर आयोजित सत्काराच्या कार्यक्रमाची परवानगी मागणाऱ्या अर्जावर कार्यवाही करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची परवानगी मागणाऱ्या अर्जावरील कार्यवाहीबाबत न्यायालयाकडे अर्ज केला होता. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठाने या अर्जाला मंजुरी देताना, असे निर्देश दिले की, प्राचीन ठेव्याला कोणताही धक्का पोहचू नये, कार्यक्रमानंतर मैदान सुस्थितीत केले जावे.
गडकरी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त २७ मे रोजी आयोजित या कार्यक्रमाला झेड प्लस श्रेणीची सुरक्षा असलेले अनेक नेते उपस्थित राहणार असल्याने आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी अपेक्षित असल्याने गडकरी सत्कार समितीने कस्तूरचंद पार्कची मागणी केली होती.
एरवी कस्तूरचंद पार्कवर पारंपरिक कार्यक्रम व्हायचे, या ऐतिहासिक मैदानाचा व्यापारिकदृष्ट्या वापर होत असल्याने अशा कार्यक्रमांवर बंदी असावी, अशा वृत्तपत्रातील बातमीचा जनहित याचिका म्हणून स्वत:हून उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. कस्तूरचंद पार्कवर होणाऱ्या महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन हे तीन शासकीय कार्यक्रम वगळता आदी समारंभ आणि कार्यक्रमावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहे.
कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रशासनाला या मैदानाव्यतिरिक्त इतर कोणतीही जागा योग्य नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयाकडे अर्ज केला होता.
या जनहित याचिकेतील न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कस्तूरचंद पार्क मैदान आणि प्राचीन ठेव्याला कोणताही धक्का पोहचू नये, अशी मागणी केली. न्यायालयानेही परावनगी देताना आयोजकांना सर्व अटी घालून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.