नैतिक मूल्य घेऊन समर्पित आयुष्य जगणाऱ्यांचा हा सत्कार : न्या.विजय डागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:40 PM2018-10-02T18:40:53+5:302018-10-02T18:43:01+5:30
सत्कार हा व्यक्तींचा होत नसून नैतिक मूल्य जोपासून समर्पित आयुष्य जगणाऱ्यांना सन्मानित केले जाते. मूल्य समर्पित आयुष्य जगणारे आज दुर्मिळ झाले आहेत. अशावेळी हे मूल्य जोपासून विविध क्षेत्रात कार्य करीत समाजाला मार्गदर्शक, पथदर्शक ठरलेल्यांचा हा सत्कार आहे. त्यांचा सत्कार समाजाला मूल्याधिष्ठीत जीवनाची प्रेरणा देत राहील, अशी भावना उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विजय डागा यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्कार हा व्यक्तींचा होत नसून नैतिक मूल्य जोपासून समर्पित आयुष्य जगणाऱ्यांना सन्मानित केले जाते. मूल्य समर्पित आयुष्य जगणारे आज दुर्मिळ झाले आहेत. अशावेळी हे मूल्य जोपासून विविध क्षेत्रात कार्य करीत समाजाला मार्गदर्शक, पथदर्शक ठरलेल्यांचा हा सत्कार आहे. त्यांचा सत्कार समाजाला मूल्याधिष्ठीत जीवनाची प्रेरणा देत राहील, अशी भावना उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विजय डागा यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी साई सभागृहात ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माजी खासदार दत्ता मेघे अध्यक्षस्थानी होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री अनिल देशमुख, बाबुराव तिडके, गिरीश गांधी, प्रफुल्ल गाडगे व्यासपीठावर उपस्थित होते. न्या. विजय डागा पुढे म्हणाले की, सत्कारमूर्तींकडून प्रेरणा घेत अनेकजण कार्य करीत आहेत. त्यांचे सत्कार्य, गुण समाजासाठी पथदर्शक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या सीमा साखरे, अरुण मोरघडे, ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर, डॉ. एल. एस. देवानी, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, माजी आमदार यादवराव देवगडे, माजी मंत्री डॉ. मधुकर वासनिक, ताराचंद खांडेकर, श्रीपाद सहस्त्रभोजनी, माजी महापौर अटलबहादूर सिंग, लक्ष्मणराव जोशी, बलबिरसिंग रेणू, रामभाऊ खांडवे, डॉ. हरीश कुळकर्णी, कैलाश अग्रवाल, उमेश शर्मा, वा. रा. गाणार, मदन गडकरी, मधुप पांडेय, केशवराव शेंडे, सलीम बेग, रमेश अंभईकर, गणेश नायडू, शफरुद्दीन साहील, शेख मोहम्मद हाशीम, सत्यनारायण शर्मा, वसंतराव डाखोळे, सिराजुद्दीन हासन, ए. जी. रहेमान, विठ्ठलराव जिभकाटे अशा वेगवेगळ््या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठांचा यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला. स्व. दुगार्दास रक्षक यांचा सत्कार सुपुत्र ज्ञानेश्वर रक्षक यांनी स्वीकारला. सत्कारमूर्तीच्या वतीने लक्ष्मणराव जोशी, बलबीरसिंह रेणू, शफरुद्दीन साहील, वा. रा. गाणार, डॉ. मधुप पांडेय, अटलबहादूर सिंग यांनी भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. बाबुराव तिडके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. श्रीराम काळे यांनी आभार मानले.
हिमालयाच्या उंचीच्या मार्गदर्शकांचा सत्कार : बावनकुळे
राष्ट्र घडविण्यासाठी प्रथम माणसं घडावी लागतात. आज सन्मानित करण्यात आलेल्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. अशा समर्पित लोकांच्या कार्यामुळे या राष्ट्राची निर्मिती झाली आहे. हिमालयाच्या उंचीच्या या मार्गदर्शकांचा सत्कार समाजाला नवऊर्जा प्रदान करेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.