व्हिडिओ लाईक्सच्या प्रेमात पडला; भामट्याला १४ लाख देऊन बसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2023 10:38 PM2023-07-08T22:38:49+5:302023-07-08T22:39:31+5:30
Nagpur News पार्ट टाइम जॉबची ऑफर देऊन व्हिडीओ लाइक करण्यासाठी चांगला फायदा होईल, अशी बतावणी करून एका युवकाला सायबर गुन्हेगाराने १४ लाखांना गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.
नागपूर : पार्ट टाइम जॉबची ऑफर देऊन व्हिडीओ लाइक करण्यासाठी चांगला फायदा होईल, अशी बतावणी करून एका युवकाला सायबर गुन्हेगाराने १४ लाखांना गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. सायबर पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
आशिष ज्ञानदेव दवंडे (वय २७, रा. तिवारीनगर, भिलगाव) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. तो घरी असताना अज्ञात सायबर गुन्हेगाराने त्याला व्हॉट्सॲपवरून दोन आयडी पाठवून पार्ट टाइम जॉबची ऑफर दिली. टास्क पूर्ण केल्यास चांगला फायदा होईल, असे आमिष दाखविले. आशिषने टास्क पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला त्याला फायदा देऊन त्याचा विश्वास संपादन केला. परंतु नंतर गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे सांगून सायबर गुन्हेगाराने वेगवेगळ्या खात्यात १४ लाख ४९ हजार ११२ रुपये टाकण्यास सांगितले. आशिषने रक्कम जमा केल्यानंतर आरोपींनी कोणताही फायदा न देता आणि मूळ रक्कम परत न करता आशिषशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आशिषने सायबर पोलिसात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४२०, सहकलम ६६ (ड) आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
..............