बैलाच्या वादातून महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:42 AM2017-09-10T01:42:12+5:302017-09-10T01:42:26+5:30
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तास शिवारात २६ जुलै रोजी एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेचा मृत्यू बैलाने मारल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी भासविण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तास शिवारात २६ जुलै रोजी एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेचा मृत्यू बैलाने मारल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी भासविण्यात आले होते. मात्र, तिचा मृत्यू बैलाने मारल्याने झाला नसून, तिचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीस अटक केली.
तीर्थाबाई जयराम सोनगडे (५५, रा. तास, ता. भिवापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. बालकदास तुलाराम अलोणे (३६, रा. तास, ता. भिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बालकदासची तास शिवारात शेती असून, त्याने यावर्षी शेतात धानाचे पºहे टाकले होते. तीर्थाबाई २६ जुलै रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास बालकदासच्या शेताजवळ तिची बैलजोडी चारत उभी होती. त्यातच जोडीतील एक बैल बालकदासच्या पºह्यात गेला.
ही बाब लक्षात येताच बालकदासने बैलामुळे पºह्याचे नुकसान होत असल्याची बतावणी करीत तिच्याशी भांडायला सुरुवात केली.
वाद विकोपास जाताच त्याने तीर्थाबाईच्या डोक्यावर पावड्याच्या दांड्याने वार केले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने ती घटनास्थळीच गतप्राण झाली. दुसरीकडे, तिचा मृत्यू हा बैलाने शिंग मारल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दर्शविण्यात आले.
त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. तिचा मृत्यू बैलाने मारल्याने झाला नसून, तिचा बालकदासने खून केल्याचे चौकशीत उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी रात्री खुनाचा गुन्हा नोंदवून बालकदासला शनिवारी सकाळी अटक केली. भिवापूर पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे करीत आहेत.
गावात कुजबूज
घटनेच्या वेळी तास येथील एक महिला घटनास्थळाच्या परिसरात शौचास गेली होती. त्यावेळी बैल शेतात शिरल्याने तीर्थाबाई व बालकदास यांच्यात भांडण सुरू असल्याचे तिच्या निदर्शनास आले. काही वेळाने तीर्थाबाईचा बैलाने मारल्याने मृत्यू झाल्याचे तिच्या कानावर आले. त्यामुळे तिने बघितलेला प्रकार घरच्या मंडळीला सांगतिला. त्यातूनच गावात कुजबूज सुरू झाली. गावात पोलीस वारंवार चौकशीसाठी येत असल्याचे पाहून बालकदासनेही त्या महिलेला धमकावणे सुरू केले होते.