एसटीतील महिला लिपिकास मारहाण, अंगावर द्रव्य टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 09:44 PM2020-09-12T21:44:58+5:302020-09-12T21:46:16+5:30
एसटी महामंडळाचे आधीच दोन महिन्यांचे वेतन झालेले नाही. त्यातही वेतनाच्या पावतीसाठी पतीने तगादा लावला. पगाराची पावती न दाखविल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर कुठलेतरी द्रव्य टाकले. आपला जीव मुठीत घेऊन ती घराबाहेर पडली आणि तिने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार नोंदविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाचे आधीच दोन महिन्यांचे वेतन झालेले नाही. त्यातही वेतनाच्या पावतीसाठी पतीने तगादा लावला. पगाराची पावती न दाखविल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर कुठलेतरी द्रव्य टाकले. आपला जीव मुठीत घेऊन ती घराबाहेर पडली आणि तिने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार नोंदविली.
दत्तनगरी पिपळा रोड निवासी २९ वर्षीय आरती २०१४ पासून एस. टी. महामंडळात अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागल्या. त्यांना आई आणि एक भाऊ आहे. नुकतेच म्हणजे दीड वर्र्षापूर्वी आरती यांचे काटोलच्या युवकाशी लग्न झाले. तोही खासगी बँकेत नोकरी करतो. पोलिस तक्रारीनुसार लग्नाच्या २० दिवसांनंतरच पती त्रास द्यायला लागला. सततचा त्रास वाढत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी सासरच्या मंडळींना त्याची माहिती दिली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर ग्रामीण पोलिस अधीक्षकांसमोर संपूर्ण प्रकरण सांगितले. त्यानंतर एक दिवस तो चांगला राहिला. पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली. अलीकडेच म्हणजे १ सप्टेंबरला पतीने पगाराची पावती मागितली. यावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आरतीने डेपो व्यवस्थापकासह हुडकेश्वर ठाणे गाठले. आरती माहेरी असताना पतीने वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे आता राग शांत झाला असा समज करून आरती काही दिवसानंतर म्हणजे ९ सप्टेंबरला औषधाची फाईल घेण्याकरिता घरी आल्या. त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. पतीने कुठला तरी द्रव पदार्थ तिच्या अंगावर फेकला. त्या घराबाहेर पळाल्या. लोकांनी मदत केली. बादलीभर पाणी अंगावर घातले. आरती यांनी १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. घटनेची गंभीरता लक्षात घेता सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे.