महिला डॉक्टरकडून दवाखान्यात गोंधळ, ‘एमआयसीयू’च्या दाराची तोडफोड
By योगेश पांडे | Published: January 31, 2023 02:21 PM2023-01-31T14:21:59+5:302023-01-31T14:37:10+5:30
डॉक्टर्स व परिचारिकांना शिवीगाळ, गुन्हा दाखल
नागपूर : दवाखान्यांमध्ये लहानसहान कारणांवरून डॉक्टर्सवर हल्ले होताना दिसून येतात व त्याविरोधात अनेक गुन्हेदेखील दाखल होतात. मात्र, चक्क एका डॉक्टरनेच इतर डॉक्टर्स व परिचारिकांना शिवीगाळ करत दवाखान्यात गोंधळ घालण्याची ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर’ घटना नागपुरात घडली. एका महिला डॉक्टरने शुल्लक कारणावरून दवाखान्यात गोंधळ घालत चक्क ‘एमआयसीयू’च्या दरवाजाला तोडण्याचादेखील प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून अशा प्रकारे एखाद्या डॉक्टरविरोधातील मागील काही कालावधीतील हा पहिलाच गुन्हा आहे.
मानकापूर पोलिस ठाण्याअंतर्गत ही घटना दोन आठवड्यांअगोदर घडली होती व रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मानकापूर येथील ॲलेक्सिस इस्पितळात हा प्रकार झाला. डॉ. रुक्मिणी फाबियानी असे संबंधित महिला डॉक्टरचे नाव आहे.
दाखल गुन्ह्यानुसार १५ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता त्या त्यांच्या वडिलांना घेऊन दवाखान्यात आल्या. त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना ‘एमआयसीयू’मध्ये भरती केले होते. दवाखान्यातील डॉ. नेहा गेडाम यांनी सायंकाळी महिला डॉक्टरला वडिलांच्या प्रकृतीचे ‘अपडेट्स’ दिले. मात्र महिला डॉक्टरने पतीला हे ‘अपडेट्स’ द्यावे असा आग्रह धरला. इतरही गंभीर रुग्ण असल्याने तुमच्या पतीशी बोलणे शक्य होणार नाही. तुम्ही स्वत: डॉक्टर असून तुम्ही तुमच्या पतीला समजावून सांगा असे ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरने सांगितले. यावरून महिला डॉक्टर चिडली व आरडाओरड सुरू केली.
दवाखान्यात १०० लोक आणून गोंधळ घालण्याची तसेच डॉक्टरांना मारहाण करण्याची धमकी दिली. याशिवाय तेथील अटेंडंट, परिचारिका यांना शिवीगाळ करत धक्काबुक्कीदेखील केली. यानंतर ‘एमआयसीयू’च्या प्रवेशदाराला लाथा मारत त्याचे लॉक व कॉलबेलदेखील तोडली. यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी याची माहिती इस्पितळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
तेथील उपसंचालक डॉ. नीलेश अग्रवाल यांनी सीसीटीव्ही तपासून खातरजमा केली. त्यानंतर मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनीदेखील फुटेजची शहानिशा केली व त्यानंतर महिला डॉक्टरविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियमाच्या कलम चार सह भा.दं.वि.च्या कलम ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका डॉक्टरनेच असा प्रकार केल्याने पोलिसांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.
१५ तारखेला कर्मचाऱ्याकडूनदेखील तक्रार
संबंधित महिला डॉक्टरने दवाखान्यातील ॲथोनी डॅनियल नामक एका कर्मचाऱ्यावर चप्पलदेखील भिरकावली होती. तसेच शिवीगाळ केली होती. ॲंथोनी यांनी १५ जानेवारी रोजीच मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. इस्पितळाकडून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजदेखील सोपविण्यात आले आहे. संबंधित डॉक्टर मुंबईत वास्तव्याला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.