नागपुरात पेट्रोल पंपावर कर्मचारी महिलेला मारहाण; आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 07:32 PM2020-04-19T19:32:43+5:302020-04-19T19:35:36+5:30

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर पेट्रोलचे पैसे मागितले म्हणून एका दुचाकीचालकाने कर्मचारी महिलेला मारहाण केली. रविवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली.

Female Employee beaten up at petrol pump | नागपुरात पेट्रोल पंपावर कर्मचारी महिलेला मारहाण; आरोपी गजाआड

नागपुरात पेट्रोल पंपावर कर्मचारी महिलेला मारहाण; आरोपी गजाआड

Next
ठळक मुद्देयशोधरानगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर पेट्रोलचे पैसे मागितले म्हणून एका दुचाकीचालकाने कर्मचारी महिलेला मारहाण केली. रविवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि इतर वाहनधारक संतप्त झाले. ते पाहून आरोपी दुचाकीचालक आपली दुचाकी सोडून तेथून पळून गेला, नंतर त्याला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली.
अक्रम शेख रहमान कुरेशी (वय ४२) असे आरोपीचे नाव आहे. तो निजामुद्दीन कॉलनी, यशोधरानगर येथे राहतो. आरोपी अक्रम शेख हा खासगी वाहन चालक असून, तो भाजीही विकतो. आज सकाळी १० वाजता इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर आरोपी अक्रम पेट्रोल भरण्यासाठी आला. पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी त्याला पेट्रोलच्या पैशाची मागणी केली असता तिच्यासोबत त्याने वाद घातला, नंतर अश्लील शिवीगाळ करून पाहता पाहता त्याने तिला मारहाण केली. हा प्रकार पाहून अन्य कर्मचारी त्याच्याकडे धावले. पंपावरील वाहनधारकांनीही आरोपी अक्रमकडे धाव घेतली, ते पाहून तो दुचाकी सोडून तेथून पळून गेला. या घटनेमुळे पेट्रोल पंप परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. पंपावरील कर्मचाऱ्यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळविली. लगेच पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी आरोपीची दुचाकी ताब्यात घेतली. महिला कर्मचारी रिना यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अक्रमविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुचाकीच्या कागदपत्रांवरून त्याचा पत्ता शोधून पोलीस त्याच्या घरी पोहचले आणि त्याच्या मुसक्या बांधल्या. विशेष म्हणजे, या पेट्रोल पंपावर यापूर्वीही अनेकदा वादावादीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसापूर्वी बाटलीत पेट्रोल देत नाही म्हणून एका समाजकंटकाने आपल्या दुचाकीतील पेट्रोल बिसलरीच्या बाटलीत काढून पेट्रोल पंपावर शिंपडले होते आणि पेट्रोल पंप पेटवून देण्याची धमकी दिली होती.

घटना सीसीटीव्हीत कैद
आजची ही संतापजनक घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटली आहे.
 

 

Web Title: Female Employee beaten up at petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.