नागपूरमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याचे कुत्र्यांनी तोडले लचके; शेजारणीने काढला वादाचा वचपा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 02:27 AM2019-11-22T02:27:27+5:302019-11-22T06:35:32+5:30
किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी शेजारी राहणाऱ्या एका सहायक पोलीस उपनिरीक्षक महिलेवर शेजारच्या महिलेने कुत्रे सोडले.
नागपूर : किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी शेजारी राहणाऱ्या एका सहायक पोलीस उपनिरीक्षक महिलेवर शेजारच्या महिलेने कुत्रे सोडले. या कुत्र्यांनी लचके तोडल्याने डिम्पल ऊर्फ शुभांगी राजेंद्र नायडू-पवार या जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्या दाम्पत्याने आपल्या पाळीव कुत्र्यांकडून हा हल्ला करवून घेतला ते दाम्पत्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे. त्याचमुळे की काय, महिला पोलिसाची तक्रार नोंदवून घेताना पोलिसांनी कचखाऊ धोरण अवलंबल्याचा आरोप पवार कुटुंबियांकडून होत आहे.
पोलीस दलच नव्हे तर उपराजधानीत चर्चेचे मोहोळ उडविणारे हे प्रकरण बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. न्यू मनीषनगरात नवनाथ सोसायटी असून, येथील तीर्थ पॅलेस अपार्टमेंटमध्ये एएसआय डिम्पल नायडू राहतात. त्या शहर पोलीस दलात, बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्या-ज्या इमारतीत त्या राहतात तेथेच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी रजत देशमुखही राहतात. त्यांनी व अन्य एकाने या इमारतीत मोबाइल टॉवर लावण्याचा आग्रह धरला होता. मात्र, सहापैकी डिम्पलसह चार रहिवाशांनी त्याला विरोध केला. या पार्श्वभूमीवर, रविवारी १७ नोव्हेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास डिम्पल कार्यालयातून घरी परतल्या. नंतर एक वर्षीय बाळाला घेतले आणि त्याला फिरविण्याच्या उद्देशाने खाली आल्या. यावेळी खाली संजना देशमुख त्यांची तीन पाळीव कुत्री घेऊन होत्या.
काय झाले कळायला मार्ग नाही, त्यांनी शूट गो ... म्हटले आणि तीनही कुत्री डिम्पल यांच्यावर धावली. छोट्या बाळाला सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डिम्पल यांना कुत्र्यांनी अक्षरश: लोळविलेच. पती राजेंद्र पवार यांनी डिम्पल यांच्या हातून बाळ घेतले. तोवर कुत्र्यांनी डिम्पल यांच्या हात, पाय, पोटरी, मांडी, कंबरेवर जागोजागी चावे घेतले आहेत.