कन्हानमध्ये भरदिवसा दरोडा

By admin | Published: May 15, 2017 02:16 AM2017-05-15T02:16:17+5:302017-05-15T02:16:17+5:30

सराफा व्यापाऱ्यावर गोळी झाडून तोंडावर स्कार्फ बांधलेल्या दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह २१ लाख ४२ हजारांचा ऐवज लुटून नेला

Feminine crackdown in Kanhan | कन्हानमध्ये भरदिवसा दरोडा

कन्हानमध्ये भरदिवसा दरोडा

Next

सराफा व्यापाऱ्यावर गोळी झाडली : २१ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : सराफा व्यापाऱ्यावर गोळी झाडून तोंडावर स्कार्फ बांधलेल्या दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह २१ लाख ४२ हजारांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेल्या सराफा व्यापाऱ्याचे नाव अमित गुप्ता (वय ४५, रा. कामठी) असे असून, त्यांच्या पायावर गोळी लागल्यामुळे त्यांना जबर दुखापत झाली आहे. रविवारी भरदुपारी कन्हान शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
कन्हानच्या गणेशनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुप्ता यांचे अमित ज्वेलर्स नामक सराफा दुकान आहे. रविवारी दुपारी १.४५च्या सुमारास चार अनोळखी तरुण काळ्या रंगाच्या दोन मोटरसायकलींवर आले. त्यांनी दुकानापासून २० फूट अंतरावर महामार्गालगत आपल्या दुचाकी उभ्या ठेवल्या आणि पायी चालत दुकानात शिरले. दोघे दुकानातील काऊंटरजवळ तर दोघे मागे उभे राहिले. अमित गुप्ता यांच्यासमोर एक आणि दुसरा गुप्ता यांच्या शेजारी असलेल्या कर्मचाऱ्याच्या समोर उभा होता. ध्यानीमनी नसताना अचानक दोघांनीही अमित गुप्ता व त्यांच्या कर्मचाऱ्यावर पिस्तूल ताणली. एकाने गुप्ता यांच्याकडे त्यांच्या पायाजवळ ठेवलेल्या पिशव्यांची मागणी केली. त्यात रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने होते. गुप्ता यांनी या पिशव्या देण्यास टाळाटाळ करताच त्याने गुप्ता यांच्या पायावर गोळी झाडली. त्यामुळे अमित गुप्ता गंभीर जखमी झाले. दहशत निर्माण करण्यासाठी दरोडेखोरांनी हवेत तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे गुप्तांसोबतच त्यांच्या नोकरालाही कापरे भरले. परिणामी त्यांनी विरोध करण्याऐवजी गप्प राहणेच पसंत केले. दरम्यान, मागे उभे असलेल्या दोघांनी लगेच रोख रक्कम व दागिन्यांच्या पिशव्या हिसकावून घेत दुकानाबाहेर पळ काढला. बाजूलाच उभ्या केलेल्या मोटरसायकलींनी ते पळून गेले.
दरोडेखोर दूर गेल्याची खात्री पटल्यानंतर गुप्ता आणि त्यांच्या नोकरांनी आरडाओरड केली. परिणामी आजूबाजूची मंडळी धावत आली. त्यांनी जखमी अवस्थेतील गुप्ता यांना कामठीतील एका खासगी रुग्णालयात नेले. पोलिसांनाही फोनवरून माहिती देण्यात आली. त्यामुळे कन्हान शहर पोलीस दलासह जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी धावला. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले, मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे कन्हान शहरात दहशत पसरली असून, दिवसाढवळ्या हा धाडसी दरोडा घालणारी टोळी कुठली, त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली.
दरम्यान, दरोड्याचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला. त्यामुळे पोलिसांनी मिळत्या जुळत्या वर्णनांच्या गुन्हेगारांची नागपूर शहर, जिल्हा तसेच आजूबाजूच्या भागातून धरपकड सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर दरोडेखोरांचा छडा लागला नव्हता.
दरोडेखोरांना लवकरच पकडू : पोलीस अधीक्षक
ज्यावेळी दरोडेखोर दुकानात शिरले. त्यावेळी तेथे स्वत: दुकानमालक गुप्ता, त्यांचे नोकर आणि ग्राहक असे सात ते आठ जण होते. त्यामुळे दरोडेखोरांनी वर पिस्तूल ताणून तीन गोळ्या झाडल्या. तर, एक थेट गुप्ता यांच्या पायावर मारली. काडतुसाच्या चारही पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात आम्हाला यश मिळेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

सात वर्षात दुसरी घटना
सशस्त्र दरोडा टाकण्याची कन्हान परिसरातील ही दुसरी घटना होय. सात वर्षांपूर्वी कन्हान नजीकच्या कांद्री येथील रोकडे ज्वेलर्सवर सकाळी ११ वाजताच्या सुमारास चौघांनी दरोडा टाकला होता. त्यात दरोडेखोरांनी चाकू आणि तलवारींचा वापर केला होता. चौघेही दोन मोटरसायकलींवर आले होते. शिवाय, अंदाजे २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यानंतर सदर दुकान कायमचे बंद झाले. रविवारी दुपारी घडलेल्या घटनेत दरोडेखोरांनी पिस्तूलचा वापर केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दरोडेखोरांच्या हालचाली लक्षात घेता हा दरोडा पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Feminine crackdown in Kanhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.