फौजदाराला अटक आणि जामीन
By Admin | Published: July 28, 2016 02:50 AM2016-07-28T02:50:57+5:302016-07-28T02:50:57+5:30
बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीला पोलीस आयुक्तालयाजवळून आपल्या घरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या...
बलात्कारीत तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : पोलीस दलात खळबळ
नागपूर : बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीला पोलीस आयुक्तालयाजवळून आपल्या घरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या फौजदाराला (एएसआय) सदर पोलिसांनी अटक केली; नंतर कोर्टातून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.अवघ्या पोलीस दलाची मान लाजेने खाली घालू पाहणाऱ्या या प्रकरणाची तक्रार पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांच्याकडे सोमवारी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी त्याची दखल घेत आयुक्तांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी एएसआय अल्ताफ अहमद गनी अहमद (वय ५७) याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून मंगळवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करून त्याच्या पीसीआरची मागणी करण्यात आली. मात्र, दोन्ही बाजू विचारात घेऊन कोर्टाने अल्ताफची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याच्या वकिलांनी लगेच जामिनासाठी अर्ज सादर केला. तो मंजूर करण्यात आल्याने अल्ताफची सुटका करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील पीडित तरुणीच्या सांगण्यावरून मंगळवारी घटनास्थळाचे अवलोकन करतानाच कपडेही जप्त करण्यात आले. अल्ताफवर निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत आहे. वृत्त लिहिस्तोवर तसा आदेश निघाल्याची माहिती नव्हती.(प्रतिनिधी)