पिकांच्या रक्षणासाठी जंगल सीमेवर कुंपण घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:04+5:302021-06-09T04:11:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगतच्या शेतशिवारात वन्यप्राणी पिके उद्ध्वस्त करतात. यात शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगतच्या शेतशिवारात वन्यप्राणी पिके उद्ध्वस्त करतात. यात शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. पिकांच्या रक्षणासाठी जंगल सीमेवर काटेरी कुंपण घाला, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत नागरिकांनी आमदार राजू पारवे यांच्याकडे नुकतेच निवेदन साेपविले.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या सीमेलगत वीरखंडी, तारणा, चिकना, धामणा, डाेंगरमाैदा, हरदाेली, गाेठणगाव आदी गावे असून, या गावालगतच्या शेतशिवारात वाघ, हरीण, नीलगाय, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा सतत वावर असताे. वन्यप्राणी शेतातील साेयाबीन, कपाशी, हरभरा, मिरची, गहू, ज्वारी आदी पिके उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेते. जंगलातील हिंस्र पाण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या सुमारास जागली करणेसुद्धा कठीण झाले आहे. काही शेतकरी पिकांच्या रक्षणासाठी जीव धाेक्यात घालून जागली करतात. परंतु वन्यप्राणी कळपाने पिके उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
पिकांच्या नुकसान भरपाईसाठी प्रादेशिक वन विभागाकडे तक्रार करायचे झाल्यास ती प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. तक्रार केल्यानंतर मदत अतिशय ताेकडी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना कायम नुकसान साेसावे लागते. परिणामी, जंगलव्याप्त शिवारातील बहुतांश शेतकरी आपली शेतजमीन पडीक ठेवणे पसंत करीत आहेत. शिवाय हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. यावर उपाय म्हणून जंगलाच्या सीमेवर काटेरी कुंपण घालण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आ. राजू पारवे यांना निवेदन देतेवेळी वीरखंडीचे उपसरपंच अनिस लाेखंडे, विनायक लाेखंडे, लंकेश वासनिक, हर्षदेव कावळे, नारायण डहाके, केजराज पडाेळे, विलास गजभिये, विक्रम रेवतकर, राजहंस गजभिये, मिलिंद वासनिक आदी उपस्थित हाेते.