फेरमतदानात २० मतदार वाढले

By admin | Published: February 7, 2017 01:50 AM2017-02-07T01:50:54+5:302017-02-07T01:50:54+5:30

नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नंदनवन येथील बुथ क्रमांक २५ मनपा मराठी प्राथमिक शाळेत निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया चुकीची राबविल्याने ...

Ferrmattdan has 20 voters | फेरमतदानात २० मतदार वाढले

फेरमतदानात २० मतदार वाढले

Next

बुथ क्रमांक २५ वर झाले मतदान : सर्वच उमेदवारांनी मांडला ठिय्या
नागपूर : नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नंदनवन येथील बुथ क्रमांक २५ मनपा मराठी प्राथमिक शाळेत निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया चुकीची राबविल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ६ फेब्रुवारीला मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी ८ पासून मतदानाला सुरुवात झाली. या बुथवर ५७० मतदार होते. सायंकाळी ४ पर्यंत ४८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ३ फेब्रुवारीला याच बुथवर ४६८ मतदारांनी मतदान केले होते. त्यात आज २० मतदारांची भर पडली.
शिक्षक मतदारसंघाचे ३ फेब्रुवारीला मतदान व ६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती. परंतु बुथ क्रमांक २५ वर निवडणूक अधिकाऱ्याने चुकीची प्रक्रिया राबविली. मतदाराच्या उजव्या हाताच्या अनामिकेवर पक्की शाई न लावता, मार्कर पेनचा उपयोग केला होता. यासंदर्भात शिक्षक भारतीचे पदाधिकारी दिलीप तडस यांनी आक्षेप घेत, निवडणूक अधिकाऱ्याने राबविलेल्या चुकीच्या प्रक्रियेची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप कुमार यांनी बुथ क्र. २५ वर निवडणूक प्रक्रियेचा चुकीचा अवलंब केल्यामुळे येथे फेरमतदानाचा निर्णय घेतला व मतमोजणी ७ फेब्रुवारीला घेण्याचे आदेश दिले. सोमवारी सकाळी ८ पासून मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या बाहेर सर्व पक्ष व संघटनांचे उमेदवार सक्रिय झाले होते. कुणी मतदारांना मनस्ताप झाल्यामुळे मतदारांचे पुष्प देऊन स्वागत केले. काही उमेदवारांनी मतदान प्रक्रिया बाजूला सारून फोटोसेशन करून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केले. अतिशय शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली.(प्रतिनिधी)

आज मतमोजणी, ५ पर्यंत निकाल अपेक्षित
२९,१७६ मतदारांनी १६ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद केले आहे. मंगळवारी सकाळी ८ पासून सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूलमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी १४ टेबल ठेवण्यात आले आहेत. नऊ फेऱ्यांमध्ये सुरुवातीची मतमोजणी होईल. त्यानंतर मतपत्रिकेवर नोंदविण्यात आलेला पसंतीक्रम लक्षात घेऊन तपशीलवार मोजणी होईल. एकूण मतदानापैकी ५० टक्के मते ज्यांना मिळतील, तो मतदार विजयी ठरेल. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या पसंती क्रमावर नागो गाणार विजयी झाले होते. यावर्षी झालेले मतदान, उमेदवारांची वाढलेली संख्या, झालेली बंडखोरी या सर्वांचा विचार केल्यास तिसरा पसंतीक्रमही विजयासाठी लागू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे विजयी निकाल सायंकाळी ५ पर्यंत लागेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Ferrmattdan has 20 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.