खत २५० रुपयाने वधारले, महागाई शेतकऱ्यांना रडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:26+5:302021-03-13T04:11:26+5:30

नागपूर : सरकारने खतांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ केली आहे. डीएपी खतांच्या ५० किलोच्या बॅगमागे २०० ते २५० रुपयांची वाढ ...

Fertilizer price hiked by Rs 250, inflation will make farmers cry | खत २५० रुपयाने वधारले, महागाई शेतकऱ्यांना रडविणार

खत २५० रुपयाने वधारले, महागाई शेतकऱ्यांना रडविणार

Next

नागपूर : सरकारने खतांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ केली आहे. डीएपी खतांच्या ५० किलोच्या बॅगमागे २०० ते २५० रुपयांची वाढ झाली आहे. ही महागाई शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी असून आधीच वाकलेल्या शेतकऱ्याला महागाई रडविणार, असेच चित्र यंदा दिसत आहे.

खतांचे नवे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. यामुळे खतांच्या खरेदीवर परिणाम पडणार आहे. उमरेड येथील कृषी केंद्र संचालक अतुल मालंदूरकर यांनीही वाढलेल्या दरांबद्दल चिंता व्यक्त केली. ही दरवाढ प्रचंड बोजा वाढविणारी असून उत्पादनावर विपरीत परिणाम पाडणारी असेल, असे ते म्हणाले. खतांवर मार्जिन कमी असल्याने उधारीवर माल कसा द्यायचा, असा विक्रेत्यांपुढे प्रश्न आहे. जुना स्टॉक नव्या दराने विकला गेल्यास फसवणुकीला अधिक वाव आहे. यावर कृषी विभाग नियंत्रण कसे राखणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

...

दर वाढल्याने खरेदीवर परिणाम होणार आहे. त्याचा वापर कमी झाल्याने या हंगामातील उत्पादनात घट येणार आहे. शेती औजारे आणि आता खतांच्या दरामध्ये वाढ केल्याने हा व्यवसाय परवडण्यासारखा राहिलेला नाही. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने यांत्रिक शेतीही महागणार आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर पडणार आहे.

- प्रमोद वैद्य, शेतकरी, वडध, ता. भिवापूर

....

कोट

२०१६-१७ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दर वाढले आहेत. ५० किलोच्या पोत्यामागे ३०० रुपये म्हणजे टनामागे ६ हजार रुपयांची दरवाढ शेतकऱ्यांना आता परवडण्यासारखी नाही. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे भाव क्विंटलमागे ५० रुपये वाढविताना आढेवेढे घेणारे सरकार खतांचे भाव सर्रास वाढविते. यामुळे कृषी केंद्र संचालकांची नफाखोरी वाढणार आहे.

- दिनेश ठाकरे, शेतकरी तथा कृषी केंद्र संचालक, काटोल

...

बियाण्यांपासून खतांपर्यंत सर्वच भाव वाढले. शेती करणे कठीण होत असताना सरकार २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करू म्हणत आहे. खत वापरणे अवघड होणार असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. कर्जाचा बोजा पुन्हा वाढणार असल्याने शेतकऱ्यांची गरिबीही पुन्हा वाढणार आहे. महागाईमुळे शेतकरी पुन्हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहचू शकतो.

- विलास दरणे, शेतकरी, उदासा, ता. उमरेड

...

असे वाढले डीएपीचे दर

खत : पूर्वीची किंमत : आताची किंमत

डीएपी : १२०० : १४५०

२०-२०-०-१३ : ९५० : ११२५

२८-२८-० : १२७५ : १५२८

१६-२०-०-१३ : ९०० : १०५०

१४-३५-१४ : १२७५ : १५००

१५-१५-१५ : १०४० : १२००

१२-३२-१६ : १२०० : १३७५

...

मशागत महागली

डिझेलचे दर प्रचंड वाढल्याने ट्रॅक्टरने शेती करणे अवघड झाले आहे. नांगरटीचे दर नाईलाजाने वाढवावे लागत असल्याने शेती कसणे कठीण झाले आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे अन्य वस्तूंच्या किमतीही वाढणार आहेत. याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होणार आहे. अन्य खतांचा वापर वाढण्याची शक्यता असल्याने त्यात वाईट अनुभव आल्यास शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दु:खाशी सामना करावा लागणार, असेच दिसत आहे.

...

Web Title: Fertilizer price hiked by Rs 250, inflation will make farmers cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.