खताच्या किमती वाढणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 02:48 AM2016-05-26T02:48:17+5:302016-05-26T02:48:17+5:30
देशभरात ३ लाख १० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. देशात २ लाख ३० हजार मेट्रिक टन खताचे उत्पादन होेते.
हंसराज अहीर : शासकीय रुग्णालयात जेनरिक औषधी उपलब्ध करणार
नागपूर : देशभरात ३ लाख १० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. देशात २ लाख ३० हजार मेट्रिक टन खताचे उत्पादन होेते. ८० हजार टन खते विदेशातून आयात केली जातात. गेल्या काही महिन्यात खतांच्या भावात वाढ झालेली नाही. यापुढेही किमती वाढणार नसल्याची ग्वाही केंद्रीय उर्वरक व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
देशभरात खतांचा तुटवडा नाही. जादा भावाने खताची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. रुग्णांना कमी किमतीत औषधी उपलब्ध व्हावी. यासाठी शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयात जेनरिक औषधी उपलब्ध करण्यात येईल. महाराष्ट्र, गुजरात व तेलंगणा आदी राज्यात वैद्यकीय उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील नागपूर शहराची यासाठी निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी अद्यावत उपकरणे लावण्यात आलेली आहेत.
कोल इंडिया लिमिटेडसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनीला भाव मिळत नव्हता. परंतु या विरोधात आंदोलन उभारले. त्यामुळे ज्या २४ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १५० कोटी मिळणार होते. त्यात ३० ते ४० पट वाढ करून २६९० कोटी तसेच १० हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. १५ प्रकल्पात १४०० कोटींचा मोबदला व ४ हजार नोकऱ्या मिळाल्याची माहिती अहीर यांनी दिली.
बल्लारपूर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव वाढवून दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नोकऱ्या स्पर्धात्मक देण्याच्या निर्णयानुसार देशात खनिज क्षेत्रातील मॉईलशिवाय इतर क्षेत्रात नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या. याला विरोध दर्शवून भूसंपादनाचा वाढीव भाव व वेकोलित १० हजारांवर नोकऱ्या मिळत आहे. कोळसा खाणीसाठी आता एकरी आठ लाख रुपये भाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरपना व भद्रावती तालुक्यातील जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आल्या आहेत. तसेच इतर भागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार गिरीश व्यास, संदीप जाधव, किशोर पालांदूरकर व चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)