शेवटच्या दिवशी नवतपाचा ताप, पारा ४३ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 10:59 AM2023-06-03T10:59:22+5:302023-06-03T10:59:47+5:30
पुन्हा दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा
नागपूर : नवतपाच्या पहिल्या पाच दिवसांत अवकाळी पावसाने सूर्याचा ताप राेखून धरला. दोन दिवस तर पारा ४० अंशांच्याही खाली गेला हाेता. मात्र, शेवटच्या दाेन दिवसांत नवतपाने चांगलाच ताप दिला असून, शुक्रवारी पारा ४३ अंशांवर पाेहोचला. एवढेच नाही, तर रविवार, ४ जून रोजी पारा ४५ अंशांच्या आसपास पोहोचण्याच्या भीतीसह उष्ण लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
तापमान वाढल्याने नागपूरकरांना उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, नागपुरातील आर्द्रता संध्याकाळी केवळ १९ टक्के, तर सकाळी २९ टक्के नोंद झाली होती. जून महिन्यात नागपूरकरांना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मान्सूनच्या आगमनाची तारीख १६ जून जाहीर केली असली, तरी यंदा विदर्भात मान्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होऊ शकतो. सध्या नैर्ऋत्य मान्सून पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्राकडे थोडा पुढे सरकला आहे. याशिवाय पंजाब, राजस्थान, ओडिशापर्यंत चक्रीवादळ तयार झाले आहे. सध्या मध्य भारताभोवती कोणतेही चक्रीवादळ किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले नाही. या कारणास्तव जून महिना खूप गरम असण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती येथे ४३.६ अंश तापमान होते. याशिवाय गोंदियामध्ये ४३.५, अकोला आणि वर्धा येथे ४३.४, चंद्रपूरमध्ये ४३.२, बुलढाण्यात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.