उपराजधानी तापाने फणफणली; १६ ते ३१ जुलैदरम्यान १,०६४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 09:10 PM2021-08-02T21:10:28+5:302021-08-02T21:11:21+5:30
Nagpur News डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी १६ ते ३१ जुलैदरम्यान शहरात सर्वेक्षण केले. ९८,००६ घरांपैकी ५,९२९ घरांत डेंग्यू अळी आढळून आली. तर तब्बल १,०६४ रुग्ण तापाचे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी १६ ते ३१ जुलैदरम्यान शहरात सर्वेक्षण केले. ९८,००६ घरांपैकी ५,९२९ घरांत डेंग्यू अळी आढळून आली. तर तब्बल १,०६४ रुग्ण तापाचे आढळून आले.
शहरात झोननिहाय सर्वेक्षण सुरू आहे. घराघरांमध्ये जाऊन मनपा पथकाद्वारे तपासणी केली जाते व डेंग्यू संदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. जुलै महिन्यामध्ये शहरातील दहाही झोनमध्ये एकूण ९८,००६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. २,६४७ जणांच्या रक्ताचे नमुने तर १४९ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान ३८,३४० घरांमधील कूलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ५,४०८ कूलर्समध्ये डासअळी आढळून आली. २,३२९ कूलर्स रिकामे करण्यात आले. ११,४७८ कूलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्युशन तर २१,४८९ कूलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंज्युरोम गोळ्या टाकण्यात आल्या. तसेच ३,०४४ कूलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.
१७२ कूलरमध्ये सोडले गप्पी मासे
सोमवारी शहरामध्ये ७,९९७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. ३७३ घरांमध्ये डेंग्यू अळी आढळली. ६८ ताप असलेले रुग्ण आढळून आले. १४३ जणांच्या रक्ताचे नमुने तर २७ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. २,६५१ घरांमधील कूलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात २१४ कूलर्समध्ये डासअळी आढळून आली. २८० कूलर्स रिकामे करण्यात आले. १,१४५ कूलरमध्ये टेमिफॉस सोल्युशन तर १,०५४ कूलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंज्युरोम गोळ्या टाकण्यात आल्या तसेच १७२ कूलर्समध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.
परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी मनपाद्वारे उपाययोजना, जनजागृती सुरू आहे. नागरिकांनीही प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी. घरात पावसाचे पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्याची भांडी व्यवस्थित झाकून ठेवावीत. घर व परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन मनपाने केले आहे.