शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचे :सजल मित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:54 AM2019-03-20T00:54:03+5:302019-03-20T00:55:19+5:30
मानवी जीवनात खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे असतात. खेळांमुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. अभ्यासासाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी जीवनात खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे असतात. खेळांमुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. अभ्यासासाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी येथे व्यक्त केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने आयोजित क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. डी. टी. कुंभलकर, स्टुडंट कौन्सिलचे प्रभारी अधिकारी डॉ. अविनाश गावंडे, डॉ. गणेश डाखले, क्रीडामंचचे प्रभारी अधिकारी डॉ. निशिकांत मानकर उपस्थित होते.
डॉ. मित्रा यांनी मशाल प्रज्वलित करून सप्ताहाचे उद्घाटन केले. १९ ते २६ मार्चदरम्यान या सप्ताहामधून विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात ‘आऊटडोअर’ व ‘इनडोअर’ खेळ खेळले जातील. ‘आऊटडोअर’ खेळांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल तर ‘इन-डोअर’ खेळांमध्ये बुद्धिबळ, टेबलटेनिस, बॅडमिंटन, कॅरम या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या पूर्वार्धात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयांतर्गत सामने खेळण्यात येतील तर उत्तरार्धात आंतरमहाविद्यालयीन सामने खेळले जातील. या स्पर्धेमध्ये नागपूरसह अमरावती, चंद्रपूर, गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजनासाठी स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष मयूर श्रीराव, सरचिटणीस शुभम महल्ले, क्रीडामंचचे अध्यक्ष निहाल लव्हाळे यांच्यासह महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाचे (२०१७ बॅच) विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
वसतिगृहांमध्ये असणार विविध क्रीडांची सोय
डॉ. मित्रा यांनी सांगितले, मैदानी खेळ हे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी फारच गरजेचे असतात. यामुळेच लवकरच वसतिगृहांमध्ये बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केटबॉलचे मैदान उभारण्याचा प्रयत्न राहणार आहे.