चामुंडी एक्सप्लोसिव्हमध्ये भीषण स्फोट; ६ ठार, ३ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 09:30 PM2024-06-13T21:30:06+5:302024-06-13T21:30:22+5:30

- मृतांमध्ये ४ तरुणी, एका विवाहितेसह पुरूषाचाही समावेश

Fierce Blast in Chamundi Explosives; 6 killed, 3 seriously | चामुंडी एक्सप्लोसिव्हमध्ये भीषण स्फोट; ६ ठार, ३ गंभीर

चामुंडी एक्सप्लोसिव्हमध्ये भीषण स्फोट; ६ ठार, ३ गंभीर

नरेश डोंगरे/जितेंद्र ढवळे, नागपूर :नागपूर जिल्ह्यातील धामना गावाजवळच्या चामुंडी एक्सप्लोसिव कंपनीत गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरूष अशा सहा जणांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड शोक संतप्त वातावरण निर्माण झाले असून संतप्त गावकऱ्यांनी नागपूर-अमरावती महामार्गावरची वाहतूक रोखत आपला रोष व्यक्त केला. वृत्त लिहस्तोवर घटनास्थळी प्रचंड तणावाचे वातावरण होते.
नागपूर-अमरावती महामार्गावर नागपूर पासून २५ किलोमीटर अंतरावर धामना हे गाव असून गावालगत महामार्गावरच चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि. कंपनी आहे.

२२ एकरात पसरलेल्या कंपनीत फटाक्यासाठी लागणारी बारूद तसेच वाती तयार केल्या जातात. दोन शिफ्टमध्ये कंपनीत काम चालते. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळपासून कंपनीतील विविध विभागात कंपनीचे कामगार काम करीत होते. पॅकेजिंग तसेच बारूदपासून तयार करण्यात आलेल्या वाती एकत्रित करण्याचे काम ज्या विभागात सुरू होते, तेथे एक महिला, ५ तरुणी आणि ३ पुरुषांसह एकूण ९ जण काम करीत होते. दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला. तो विभागच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातही भीषण आग लागली. त्यामुळे अन्य विभागातील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी स्फोट झालेल्या पॅकेजिंग विभागाकडे धावले.

जिवावर उदार होऊन काही जणांनी आतमध्ये होरपळून पडलेल्यांना बाहेर काढले. दरम्यान, स्फोटामुळे बसलेल्या हादऱ्यांनी आजुबाजुच्या गावातील मंडळीही घटनास्थळाकडे धावली. कुणी प्रशासनाला, कुणी अग्निशमन विभागाला, कुणी पोलिसांना तर कुणी लोकप्रतिनिधींना फोनवरून माहिती दिली.

दीड तासानंतर पोहचली रुग्णवाहिका
अत्यंत गंभीर अवस्थेत विव्हळणाऱ्या जखमींना तातडीने उपचार मिळावे म्हणून गावकरी रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करीत होते. मात्र, प्रशासनाकडून थंड प्रतिसाद होता. तब्बल दीड तासानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली. अग्निशमन दलाचे बंबही पोहचले. तोपर्यंत चार ते पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना तसेच जखमींना नागपुरातील रवीनगर चाैकात असलेल्या डॉ. दंदे हॉस्पीटल आणि सेनगुप्ता हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. तेथे पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. चार जखमींपैकी नंतर शितल चटप (क्षीरसागर) या विवाहितेचाही मृत्यू झाल्याचे वृत्त धामन्यात धडकले.

पंचक्रोशी शोकसंतप्त; प्रचंड तणाव

या भीषण स्फोटाचे वृत्त धामना पंचक्रोशित आगीसारखे पसरले आणि शोकसंतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येत घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहआयुक्त अस्वती दोरजे यांच्यासह मोठा पोलीस ताफा, दहशतवाद विरोधी पथक, बीडीडीएस, फॉरेन्सिक टीमसह विविध विभागाचे अधिकारीही पोहचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी चाैकशी सुरू केली. तत्पूर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी जि.प.अध्यक्षा सुनीता गावंडे, जि.प.सदस्या भारती पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोहचून जखमींसाठी मदतकार्य राबविणे सुरू केले होते. घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला असतानाच आमदार समीर मेघे, माजी आ. प्रकाश गजभिये यांनीही तेथे धाव घेऊन संतप्त नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.

रोषाचा भडका, वाहतूक रोखली
या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर संतप्त कामगार आणि गावकऱ्यांच्या रोषाचा भडका उडाला. त्यांनी व्यवस्थापन तसेच प्रशासनाच्या अनास्थेचे गाऱ्हाणे मांडून त्यांचा निषेध नोंदवत नागपूर-अमरावती महामार्गावरची वाहतूक रोखली. परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळताच मोठा पोलीस ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर कंपनी परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते.

अशी आहेत मृतांची नावे

प्रांजली किसन मोदरे (२२) रा.धामना
वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०) रा.धामना

प्राची श्रीकांत फलके (१९) रा.धामना
मोनाली शंकरराव अलोने (२५) रा.धामना

पन्नालाल बंदेवार (६०) रा.सातनवरी
शितल आशिष चटप (३०) रा.सातनवरी

जखमींची नावे -

श्रद्धा वनराज पाटील (२२) रा.धामना
प्रमोद चवारे (२५) रा.नेरी

दानसा मरसकोल्हे (२६) रा.मध्यप्रदेश

Web Title: Fierce Blast in Chamundi Explosives; 6 killed, 3 seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.