वाघासोबत झालेल्या झटापटीत छाव्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:07 AM2018-05-25T00:07:30+5:302018-05-25T00:07:46+5:30
पश्चिम पेंच परिक्षेत्रातील कोलितमारा बिट कक्ष क्रमांक ६६८ मध्ये २० मे रोजी, दुपारी ५ वाजता एक वाघ छावा (मादी) मृतावस्थेत आढळून आली. हा वाघ छावा (मादी) दुसऱ्या मोठ्या वाघाकडून मारल्या गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक आर.एस. गोवेकर यांनी सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पश्चिम पेंच परिक्षेत्रातील कोलितमारा बिट कक्ष क्रमांक ६६८ मध्ये २० मे रोजी, दुपारी ५ वाजता एक वाघ छावा (मादी) मृतावस्थेत आढळून आली. हा वाघ छावा (मादी) दुसऱ्या मोठ्या वाघाकडून मारल्या गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक आर.एस. गोवेकर यांनी सांगितले आहे.
मृत वाघाच्या मानेवर, नाकावर, पुढील पायावर खोल जखमा तसेच समोरच्या शरीराच्या बाजूच्या भागावर सुध्दा काही जखमा दिसून आल्या. घटनास्थळापासून जवळच मोठ्या वाघाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा आढळल्या असून सदर वाघ छावा (मादी) चे सर्व अवयव शाबूत आढळले आहेत. घटनास्थळी वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पंचे व्याघ्र प्रकल्प उपस्थित होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्लीचे वैभव सी. माथूर हे सायंकाळी ६.१५ वाजता घटनास्थळी पोहचले. त्यांचे उपस्थितीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे प्रचलित प्रमाणभूत पध्दतीप्रमाणे (एसओपी) कार्यवाही करण्यात आली आहे.
मृत वाघ छावा (मादी) चे शवविच्छेदन व अनुषंगिक कार्यवाही २१ मे रोजी करण्यात आली. शवविच्छेदनानंतर या छाव्याचा मृत्यू हा मोठ्या वाघाशी किंवा वाघिणीशी झालेल्या झटापटीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत वाघ (मादी) हा पेंच व्याघ्र प्रकल्पातील टीएफ ३ वाघिणीचा छावा असल्याचे निष्पन्न झाले व त्याचे वय अंदाजे एक वर्षाच्या आत असल्याचे गोवेकर यांनी सांगितले.