नागपूर-हिंगणा एमआयडीसीत पेंटच्या कारखान्याला आग, कच्च्या-पक्क्या मालासह मशिनरी जळाल्या

By मंगेश व्यवहारे | Published: June 28, 2023 12:24 PM2023-06-28T12:24:40+5:302023-06-28T12:27:18+5:30

कारखान्यात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने भडका घेतला

Fierce fire at Sarda thinner company in Nagpur-Hingna MIDC | नागपूर-हिंगणा एमआयडीसीत पेंटच्या कारखान्याला आग, कच्च्या-पक्क्या मालासह मशिनरी जळाल्या

नागपूर-हिंगणा एमआयडीसीत पेंटच्या कारखान्याला आग, कच्च्या-पक्क्या मालासह मशिनरी जळाल्या

googlenewsNext

हिंगणा (नागपूर) : हिंगणा एमआयडीसीतील प्लास्टिक पेंट तयार करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी सकाळी १०:३० च्या सुमारास लागलेल्या आगीत इमारतीसह कारखान्यातील मशिनरीसह लाखो रुपयांचा कच्चा व पक्का माल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. दुपारी तीन वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले होते.

एमआयडीसी परिसरात कॅण्डीको कंपनीलगत प्लॉट नं. एम-६ मध्ये मदनकृष्ण कामत यांचा इलिजिएंट सुपरपोलिप्लास्ट प्रा. लि. हा प्लास्टिक रेल्वे व मेट्रो गाड्यांकरिता लागणारा प्लास्टिक पेंट तयार करण्याचा कारखाना आहे. यात दिवसा एकाच पाळीत काम सुरू असते. मंगळवारी कारखाना बंदच होता. बुधवारी सकाळी १० वाजता ६ कामगार कामावर आले. कामकाज सुरू असताना अचानक एका चेंबरमध्ये केमिकल पावडर वाळविण्यासाठी लावलेल्या हॅलोजन लाईटनी पेट घेतला. काही क्षणातच आग पसरत गेली. सर्व मजूर पळत कारखान्याच्या बाहेर आले. त्यानंतर व्यवस्थापक अजय प्रभू यांना माहिती दिली. लगेच अग्निशमन दल व पोलिसांना कळविण्यात आले.

एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी आनंद परब व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्लास्टिक पेंटमध्ये थिनर हा ज्वलनशील पदार्थ असल्याने साध्या पाण्याने आग विझविणे कठीण होते. त्यामुळे केमिकल फोमची गाडी बोलावण्यात आली. तसेच नागपूर महानगरपालिका, बुटीबोरी, वाडी नगरपरिषद येथून सुद्धा अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. दुपारी तीनच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. परंतु आतमध्ये पेंट व थिनरचे काही कंटेनर होते, त्यावर जळालेल्या शेडचा मलबा पडला होता. त्यामुळे कुठे कुठे आग अचानक पेट घेत असल्याने अग्निशमन दलाचे पथक सायंकाळपर्यंत केमिकल फोमद्वारे आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

या कार्यवाहीत अग्निशमन दलाचे एस. जे. जाधव, बी. एम. बोनदाडे, आर. डी. साखरे, एन. एस. गायकवाड, एस. एफ. वासनकर, व्ही. ए. मटकुले, ए. बी. देशमुख, एम. जी. ब्राह्मणकर, ए. डब्लू. डगवाले, एस. एम. इंगळे, ए. बी. राठोड, एस. एल. पाटील, पी. बी. वरूडकर, व्ही. जी. गटकिने, एम. एच. नागलवाडे आदी सहभागी होते. तसेच पोलिस उपायुक्त अनुराज जैन, सहा पोलिस आयुक्त प्रवीण तेजाळे, एमआयडीसीचे ठाणेदार भीमा नरके व स्टाफ घटनास्थळी दाखल झाला होता. तसेच तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर, मंडळ अधिकारी राजेश चुटे, तलाठी ठाकरे, ग्राम पंचायत निलडोहचे कर्मचारी व तालुका आरोग्य विभागाच्या दोन रुग्णवाहिका व स्टाफ घटनास्थळी हजर होता.

कारखान्यात ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने भडका घेतला होता. पण आग नेमकी कशाने लागली व किती रुपयांचे नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. पंचनाम्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

- आनंद परब, अग्निशमन अधिकारी, एमआयडीसी हिंगणा

Web Title: Fierce fire at Sarda thinner company in Nagpur-Hingna MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.