नरखेड येथे भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:27 AM2020-12-04T04:27:06+5:302020-12-04T04:27:06+5:30
नरखेड : नरखेड येथील रतन ले-आऊट परिसरात बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आगीचा भडका उडाला. त्यात तीन घरे,तीन ...
नरखेड : नरखेड येथील रतन ले-आऊट परिसरात बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आगीचा भडका उडाला. त्यात तीन घरे,तीन गोठ्याची राख झाली असून घरातील जीवनोपयोगी साहित्य,गोठ्यातील शेतीचे साहित्य, गोठ्यात बांधून असलेल्या बछड्यासह गाईचा जळून मृत्यू झाला. मदतीकरिता धावून आलेले तीन युवक जखमी झाले आहे. या आगीत १५ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. गोठ्याला आग लागल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम नगर परिषदेच्या अग्निशमन दलास ही बाब कळविली. परंतु न.प. प्रशासनाच्या लेटलतिफपणाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. अग्निशामक दल तब्बल एक तास उशिरा पोहोचल्यामुळे आग झपाट्याने वाढली . हरिश्चंद्र कामडे, रंजन हरी रेवतकर, रामदास नामदेव चरडे यांच्या गोठ्यातील वाळलेले साहित्य, संत्रा झाडाला आधार म्हणून लावायचे वेळू, गुराचे वैरण, रासायनिक खते, ठिबक साहित्य, स्प्रिंकलर, मोटर पंप इत्यादींनी पेट घेतला. शेजारच्या गणपती लक्ष्मण कामडे,भरतलाल लोटन गौतम, गजेंद्र राजेंद्र टेकाडे यांच्या घरातील अन्नधान्य, कापूस,रोख रक्कम, जीवनोपयोगी साहित्य मुलाचे शैक्षणिक साहित्य व कागदपत्रे आगीत जळून राख झाले. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला असता तीन युवक त्यात जखमी झाले. आगीची तीव्रता लक्षात घेता ले-आऊट मधील नागरिकांनी सिलेंडर घराबाहेर काढले व जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात मोठ्या प्रमाणात कच्ची घरे व दाट वसाहत असल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत भक्ष्य झालेल्या घरे व गोठ्याचा पंचनामा पटवारी प्रदीप बुद्रुपे यांनी करून तहसीलदार डी.के. जाधव यांना सादर केला आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अग्निशामक दलविरोधात नाराजी
प्रत्येक न.प. मध्ये अग्निशामक दल हा स्वतंत्र विभाग असून शासनाने त्यासाठी पर्यवेक्षकसुध्दा नियुक्त केला आहे. त्याला २४ तास सेवेच्या ठिकाणी व साहित्यानिशी सजग असणे आवश्यक आहे. परंतु अग्निशामक दलाचे पर्यवेक्षक हर्षल जगताप हे मुख्यालयी राहत नसून कार्यालयात दुसऱ्या ठिकाणाहून ये-जा करतात. त्यामुळे अशा घटनांना आळा घालता येत नाही, असा आरोप रत्नाकर मडके, संजय चरडे, सुदर्शन नवघरे यांनी केला आहे.