‘ईव्हीएम’ला तीव्र विरोध : नागपूरनजीकच्या वानाडोंगरीत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 10:36 PM2018-07-26T22:36:39+5:302018-07-26T22:39:24+5:30
हिंगणा वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)मध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार वानाडोंगरी परिसरातील शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. कडकडीत बंद पाळण्यात आला. तुरळक घटना वगळता बंद हा शांततेच्या मार्गाने झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणा वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन)मध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी ‘वानाडोंगरी बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार वानाडोंगरी परिसरातील शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. कडकडीत बंद पाळण्यात आला. तुरळक घटना वगळता बंद हा शांततेच्या मार्गाने झाला.
‘ईव्हीएम’चा विरोध करीत बॅलेट पेपरनेच निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी नगर परिषद आणि तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यानंतर गुरुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी ७ वाजतापासून सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी सर्व व्यापारी प्रतिष्ठानच्या मालकांना आवाहन करीत प्रतिष्ठाने बंद केले.
बंददरम्यान जिल्हा परिषदेची शाळा वगळता इतर सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. सर्वपक्षीय कार्यकर्ते सकाळी राजीवनगरात दाखल होऊन नागपूर महापालिकेची ‘आपली बस’सह स्कूल बस अडविल्या. एवढेच काय तर वायसीसीई कॅम्पससमोर एका स्कूलबसवर दगड भिरकावला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तोपर्यंत पोलीस तेथे पोहोचले. त्यामुळे अनर्थ टळला. बर्डी ते हिंगणा जाणाऱ्या बसेस वानाडोंगरीपर्यंत येऊन परत गेल्या. यामुळे प्रवाशांना, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मात्र सुरू होत्या. बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलक नगर परिषदेकडे येत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालय कुलूपबंद करून ते घराकडे गेले. त्यामुळे तेथेही अनुचित प्रकार होण्यापासून टळले. सर्वपक्षीयांनी पुकारलेला हा बंद कडकडीत पाळण्यात येऊन व्यापाऱ्यांनीही त्यांच्या हाकेला साद घातली.
तेव्हा ‘ईव्हीएम’ सेट नव्हती काय?
वानाडोंगरी नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन उतरलो. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचलो. मतदार राजा हा हुशार आहे. तो कसल्याही भूलथापांना बळी पडला नाही. विरोधकांना मात्र आता पराभव पचनी पडत नाही म्हणून त्यांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडणे सुरू केले आहे. ‘ईव्हीएम’ सेट करून निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्यांनी पारशिवनी येथील निवडणूक डोळ्यासमोर ठेवावी. तेथेही आम्ही ईव्हीएम सेट केले होते काय. एवढेच काय तर रायपूर ग्रामपंचायत आणि हिंगणा नगर पंचायतमध्येही गत काळात निवडणूक होऊन भाजपचा पराभव झाला. तेव्हा ईव्हीएम सेट नव्हते काय, असा प्रश्न उपस्थित करीत विरोधकांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, असे आवाहन आ. समीर मेघे यांनी पत्रकार परिषदेत केले.
‘ईव्हीएम’वर पराभवाचे खापर फोडणे कितपत योग्य : समीर मेघे
वानाडोंगरी नगर परिषदेत भाजपचा झालेला विजय हा जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. मात्र विरोधक आता पराभवाचे खापर हे ‘ईव्हीएम’वर फोडत आहे. त्यांनी पराभव स्वीकार करावा. लोकांना भडकवून आंदोलनाचा मार्ग पत्करणे ही कृती दिशाभूल करणारी आहे. विरोधकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे. मात्र त्यांनी बंददरम्यान स्कूल बसवर दगडफेक केली. असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर दोन दिवसांत गुन्हे दाखल करावे. अन्यथा भाजपही रविवारपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल, असे हिंगण्याचे आ. समीर मेघे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वानाडोंगरी परिसरात मागील तीन वर्षांत १६ कोटींची विकास कामे झाली. लवकरच आणखी विकास कामांचा धडाका लागणार आहे. या परिसरातील प्रस्तावित ‘कोल बेल्ट’ रद्द व्हावा, यासाठी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला. असे असताना केवळ तहसीलदारांना निवेदन दिले म्हणून कोळसा खाण रद्द झाली, असा प्रचार करीत आहे. या भूलथापांना येथील जनता बळी पडली नाही. या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांविरोधात लढले. या विरोधकांना त्यांचे सर्वमिळून २१ उमेदवार निवडणुकीत उभे करता आले नाही. पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज व्यवस्थित भरता येत नाही, ते येथील विकास काय करणार, असा प्रश्न उपस्थित करीत मेघे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.