पंधरा दिवसात सोने २,६०० रुपयांनी उतरले; चांदीत २,७०० रुपयांची घसरण
By मोरेश्वर मानापुरे | Published: June 3, 2024 08:00 PM2024-06-03T20:00:14+5:302024-06-03T20:00:40+5:30
सोमवार, ३ जूनला सोन्याच्या दरात तीनदा बदल झाले.
नागपूर : मे महिन्यात पहिल्या तीन आठवड्यात सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे झाल्याचे दिसून आले. मात्र चौथ्या आठवड्यापासून अर्थात २१ मेपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात घसरण पाहायला मिळाली. पंधरा दिवसात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर २,६०० रुपयांनी कमी होऊन ३ जून रोजी ७२,१०० रुपयांवर स्थिरावले. हे ग्राहकांसाठी दिलासादायक वृत्त आहे.
सोमवार, ३ जूनला सोन्याच्या दरात तीनदा बदल झाले. सकाळच्या सत्रात ४०० रुपयांची घसरण झाली, मात्र दुपारी २०० रुपये आणि सायंकाळी १०० रुपयांची वाढ होऊन भाव ७२,१०० रुपयांवर गेले. एकूणच पाहता शनिवारच्या तुलनेत सोमवारी १०० रुपयांची घसरण झाली. दुसरीकडे चांदीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली. सकाळच्या सत्रात चांदीचे दर ५०० रुपयांनी घसरले. नंतर ५०० रुपयांनी पुन्हा वाढले. दुपारनंतर ५०० रुपयांची वाढ आणि अखेरीस ३०० रुपयांची वाढ होऊन शुद्ध चांदीचे प्रति किलो भाव ९१,३०० रुपयांवर पोहोचले.
महिन्यात चांदीत तब्बल १० हजारांची वाढ!
गेल्या एक महिन्यात चांदीच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाली. ३ मे रोजी शुद्ध चांदीचे प्रति किलो दर ८१ हजार रुपयांवर होते. या मौल्यवान धातूची खरी वाढ ६ मेपासून होऊ लागली. १५ मे रोजी ८५,३००, २० मे रोजी ९१,५००, २१ मे आणि २८ मे रोजी ९४ हजारांवर तर २९ मे रोजी भावपातळी सर्वोच्च ९४,६०० रुपयांवर गेली. या दिवशी तीन टक्के जीएसटीसह चांदीचे भाव ९७,१२९ रुपयांवर गेले. त्यानंतर चांदीच्या दरात ३ जूनपर्यंत ३,३०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतरही चांदीची खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.