मृत्यूचे पाचवे कारण लिव्हर कॅन्सर : डॉ. गौरव गुप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:02 PM2018-04-21T22:02:40+5:302018-04-21T22:03:13+5:30
मधुमेह, रक्तदाब, व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण नसल्यास यकृत (लिव्हर) निकामी होण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. लठ्ठपणामुळे होणारे ‘फॅटी लिव्हर’ हेही एक कारण यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरत आहे. शंभर जणामध्ये प्रत्येक तिसरी व्यक्ती ‘लिव्हर सिरोसीस’ या आजाराने बाधित आहे. परिणामी, भारतात लिव्हर कॅन्सर मृत्यूचे पाचवे कारण ठरले आहे, अशी माहिती लिव्हर प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. गौरव गुप्ता यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मधुमेह, रक्तदाब, व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण नसल्यास यकृत (लिव्हर) निकामी होण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. लठ्ठपणामुळे होणारे ‘फॅटी लिव्हर’ हेही एक कारण यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरत आहे. शंभर जणामध्ये प्रत्येक तिसरी व्यक्ती ‘लिव्हर सिरोसीस’ या आजाराने बाधित आहे. परिणामी, भारतात लिव्हर कॅन्सर मृत्यूचे पाचवे कारण ठरले आहे, अशी माहिती लिव्हर प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. गौरव गुप्ता यांनी येथे दिली.
नागपुरात यकृत प्रत्यारोपणासाठी तीन खासगी रुग्णालयाला आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे यकृत प्रत्यारोपणाची सोय पहिल्यांदाच उपलब्ध होत असल्याने डॉ. गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गुप्ता म्हणाले, सध्या लिव्हरच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, असे असताना यकृत प्रत्यारोपणाला मंजुरी मिळालेल्या रुग्णालयांमध्ये वोक्हार्ट हॉस्पिटलचाही समावेश झाल्याने रुग्णांना आता नागपूरबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. यकृतला हिपॅटायटीस ए, बी, सी व डी या पाच प्रकारच्या विषाणूंची बाधा होते. यापैकी हिपॅटायटीस ‘ए’ हा आजार बराच कॉमन आढळतो, तर हिपॅटायटीस ‘बी’ हा गंभीर आजार असून त्यावरील लस ही विकसित झालेली आहे. हिपॅटायटीस ‘डी’ आणि ‘इ’ त्या प्रमाणात धोकादायक नाहीत. परंतु हिपॅटायटीस ‘सी’ ही विषाणूबाधा त्या तुलनेत गंभीर मानली जाते. मुख्य म्हणजे हिपॅटायटीस ‘सी’ ची बाधा झाल्यावर कित्येक वर्षं हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात. यामुळे वेळीच निदान होणे आवश्यक असते. बदलत्या जीवनशैलीमुळे ‘फॅटी लिव्हर’चा आजार वाढत आहे. अत्यंत गभीर यकृतच्या आजाराच्या कारणांपैकी हा आजार समोर येत आहे. ‘फॅटी लिव्हर’मुळे सिरोसिसही होण्याची शक्यता असते. हा आजार रोखता येण्यासारखा आहे. फक्त सुरूवातीच्या टप्प्यात केवळ जीवनशैलीत बदल करावे लागतात. नियमित व्यायाम व स्थुलतेवर लक्ष ठेवल्यास हा आजार उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.
दारूशी संबंधित यकृताचा आजार सर्वाधिक
भारतात दारूशी संबंधित यकृताचा आजार सर्वाधिक आहे. दारू सेवन करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिलांना यकृताचा आजार लवकर होण्याची शक्यता असते. अल्कोहोलमुळे यकृत निकामी झालेले बहुसंख्य रुग्ण शेवटच्या टप्प्यात उपचारांसाठी येतात. यातील केवळ एक तृतीयांश रुग्णच यकृत प्रत्यारोपण करतात.