पाचव्या वर्षीच समजेल पन्नाशीतील आजार
By admin | Published: January 17, 2016 02:45 AM2016-01-17T02:45:04+5:302016-01-17T02:45:04+5:30
केवळ पाच सीसी रक्ताच्या माध्यमातून पाच वर्षाच्या मुलाला ५० वर्षानंतर होणाऱ्या आजाराची माहिती मिळू शकेल.
‘जीनोम’ तंत्रज्ञानामुळे ‘सायंटिफिक’ जन्मपत्रिका शक्य : अश्विन मेहता यांच्याशी संवाद
नागपूर : केवळ पाच सीसी रक्ताच्या माध्यमातून पाच वर्षाच्या मुलाला ५० वर्षानंतर होणाऱ्या आजाराची माहिती मिळू शकेल. ही अशक्य वाटणारी गोष्ट ‘जीनोम’ तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे. अमेरिकेत या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘सायंटिफिक’ जन्मपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेवर अभ्यास सुरू आहे. येणाऱ्या पाच वर्षात या जन्मपत्रिकेला मोठी मागणी असणार आहे, हा दावा जसलोक हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरचे संचालक व इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अश्विन बी. मेहता यांनी केला आहे.
अर्नेजा हार्ट अॅण्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया (सीएसआय) व असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया (एपीआयआय) विदर्भ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून दोन दिवसीय ‘नागपूर लाईव्ह-२०१६’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत मुख्य मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मेहता म्हणाले, ‘जीनोम’ हे फार प्रभावी तंत्रज्ञान आहे. यात संबंधित मुलाला वयाच्या ४५व्या वर्षी मधुमेह, ५५व्या वर्षी कॅन्सर, ६०व्या वर्षी हृदयरोग आदी होणार किंवा नाही याची माहिती मिळेल. या सायंटिफीक पत्रिकेत कुठला आजार होण्याची शक्यता आणि संभावित तारखेचाही उल्लेख असणार आहे. जर आजार होण्यापूर्वीच त्याची माहिती मिळत असेल तर त्यावर उपचार किंवा प्रतिबंधक उपाययोजना करणे शक्य होऊ शकेल. वैद्यकीय क्षेत्रात हे एकक्रांतिकारी संशोधन ठरेल. अमेरिकेत याचा उपयोग होणे सुरू झाले आहे. भारतातही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.