अंजीर हलवा, डब्बा चाय, खजूर बर्फी, मिरची भजी आणि बरेच काही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:01 PM2019-06-04T13:01:22+5:302019-06-04T13:14:44+5:30
रमजान ईदनिमित्त शहरातील मोमिनपुरा भागात सजलेल्या रमजान मार्केटला नागपूर फुडीज या सोशल मिडियावर लोकप्रिय असलेल्या खवैय्या ग्रूपने अलीकडेच भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: रमजान ईदनिमित्त शहरातील मोमिनपुरा भागात सजलेल्या रमजान मार्केटला नागपूर फुडीज या सोशल मिडियावर लोकप्रिय असलेल्या खवैय्या ग्रूपने अलीकडेच भेट दिली. या ग्रूपचे अॅडमिन प्रणय पाटील आणि शोएब मेमन यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या फूड वॉकचा आनंद ग्रूपच्या सदस्यांनी मनमुराद लुटला.
मोमिनपुरा भागात दरवर्षी रमजान महिन्यानिमित्त बाजार भरतो. विशेष म्हणजे तो रात्रभर सुरू असतो. बाजारात खाद्यपदार्थांची रेलचेल असते, कपड्यांची दुकाने सजलेली असतात आणि दागिन्यांच्या दुकानातील झळाळीने अवघा बाजार चमचमत असतो. सामिष-निरामिष आहाराचे अनेकोनेक उत्तम पदार्थ येथे उपलब्ध असतात.
नागपूर फूडीजचे अक्षय, आदिती, अपूर्व, योगेश यांच्यासह बरीचशी तरुणाई मंडळी नागपुरातल्या कडक उन्हाची, घामांच्या धारांची पर्वा न करता साडेपाचच्या सुमारास बाजारात हजर झाले होते. ईदनिमित्त आलेल्या मुस्लीम बांधव व स्त्रियांची प्रचंड गर्दी, धक्काबुक्की, खेचाखेच यांना पार करत नागपूर फूडीजने आपला फूड वॉक सुरू केला.
सर्वात प्रथम थंडगार आम का पन्हा पोटात गेल्यावर सर्वांनाच बरे वाटले. नंतर मोर्चा वळवला तो मिरची पकोड्यांकडे. त्यासोबत चटपटीत चणा होताच. त्या पाठोपाठ रोल्सही आले. आता सर्वांनाच चहा हवा होता. या ठिकाणी प्रथमच सगळ््यांना डब्बा चहा अनुभवायला मिळाला. एका स्टीलच्या छोट्याशा मगमध्ये खारीचा चुरा, खारट बिस्किटाचा चुरा आणि लहानसा रोट असे ठेवून त्यावर चहा ओतला की तयार झाला डब्बा चहा. लहानपणी चहाच्या किंवा दुधाच्या कपात बिस्किटाचा पडलेला तुकडा चमच्याने खाण्यातली मौज सर्वांनीच बऱ्याच वर्षांनी मनमुराद अनुभवली. त्यानंतर समोर आला तो अंजीर हलवा. लहानशा कपातला हा हलवा तोंडात ठेवला की विरघळून जात होता. या सर्वांच्या जोडीला आंब्याचा रस, खजुराची बर्फी, मूगडाळीचा हलवा, गुलाबजाम, फालुदा ही मंडळीही हजर होतीच. मध्येच एकदा येथील फेमस लस्सीही पोटात गेली. किती खावे आणि काय काय खावे असे झाले होते. मोमिनपुरा भागातील या फूड वॉकची सरतेशेवटी उत्तम दर्जाच्या बिस्किटे व नानकटाईने सांगता करण्यात आली.
नागपूर फूडीजतर्फे असे अनेक फूड वॉक वेळोवेळी काढण्यात येत असतात अशी माहिती ग्रूप अॅडमिन प्रणय पाटील यांनी दिली.